Breaking News

एकात्मिक शेतीला पशुसंवर्धनाची जोड महत्वाची : डॉ. विश्वनाथा


राहुरी : पशुसंवर्धनाची शेतीला जोड असल्याशिवाय शेती शाश्वत होऊ शकत नाही. पशुसंवर्धन शेतीचा आत्मा आहे. पशु संवर्धनातील मेंढीपालन एक अविभाज्य भाग आहे. मेंढपालांसाठी मेंढ्या या चालता बोलता एटीएम आहे. मेंढ्यांसाठी चराऊ क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. शास्त्रज्ञांनी बंदिस्त मेंढीपालन, मेंढ्यांचे खाद्य आणि चारा यावर संशोधन करावे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेतीला पशुसंवर्धनाची जोड देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले.
येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्था, अंबिकानगर, राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मेंढी सुधार प्रकल्पाची देशपातळीवरील वार्षिक आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवीदिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पशू विज्ञान) डॉ. जे. के. जीना, सहाय्यक महासंचालक डॉ. आर. एस. गांधी, जयपूर येथील केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अरुण कुमार, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, राष्ट्रीय पशु अनुवंषिक संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर्जव शर्मा आदी उपस्थित होते. उपमहासंचालक डॉ. जे. के. जीना म्हणाले, दरवर्षी आपल्या देशात ९ टक्के मेंढींची संख्या कमी होत आहे. मेंढींची संख्या वाढविण्यासाठी अधिक उत्पादन देणार्या मेंढींच्या जाती विकसिक करणे गरजेचे आहे. संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक महासंचालक डॉ. आर. एस. गांधी, संचालक डॉ. अरुण कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. यशवंत फुलपगारे, डॉ. उध्दव भुईटे, डॉ. संजय मंडकमाले, मेंढी प्रकल्पाचे डॉ. योगेश कांदळकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध प्रकाशनांचे विमोचन हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. राहुल देसले यांनी केले. या बैठकीला मेंढीवर संशोधन करणारे देशभरातील २० शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी डॉ. रविंद्र निमसे, डॉ. आडांगळे, डॉ. अरुण देशमुख यांनी परीश्रम घेतले. डॉ. उध्दव भुईटे यांनी आभार मानले.