Breaking News

पोटचार्‍यांमधील झुडपे बनली शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी


कर्जत : कुकडी, घोड व सीना धरणाच्या कालव्यांच्या व पोटचार्‍यांमध्ये झाडेझुडपे वाढलेली असुन ती काढण्याची मागणी शेतकर्‍यांसह नागरिकांकडून केली आहे.

कुकडी व सीना धरणाच्या कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी कालव्याच्या व पोटचार्‍यांमध्ये मोठमोठी झाडे तसेच खुरटी झुडपे वाढलेली आहेत. या चार्‍यांमध्ये झाडे, झुडपे वाढल्यामुळे कॅनॉलला पाणी सुटल्यानंतर अधिक प्रमाणात पाणी अडविण्याचे काम करत असतात. त्यामुळे एकाच जागी अधिक पाण्याचे संचयन होते, पुढे पाणी प्रवाही होत नसल्याने ओव्हरफ्लो होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे कालवा फुटण्याचा धोकादेखील असतो. त्याचबरोबर चार्‍यांच्या बाजुला असलेल्या शेतामध्ये पाणी जावून शेत खारवटीला देखील येत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. बहूदा शेतकर्‍यांचे पिक पाण्याखाली गेल्याने पिक वाया जाण्याचे प्रकार देखील या परिस्थितीमध्ये घडून आल्याचे दिसून येते.
 
कुकडी कालवा काम होवून 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही कालव्याच्या पोटचार्‍यांची कामे रखडलेली दिसत आहेत. पोटचार्‍यांची कामे सुरू होण्याची लाभधारक शेतकर्‍यांसह नागरिक चातकासारखी वाट पाहत आहेत. या उपचार्‍यांमध्ये वाढलेली झाडं झुडपं शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी बनलेली असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.