Breaking News

वाटर कप सहभागी गावांना शासनाच्या वतीने दीड लाखांचा निधी.


कर्जत : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंत सहभागी झालेल्या गावाना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मशिनरीसाठी दीड लाख रुपये मिळणार्‍या प्रोत्साहनपर निधीच्या चेकचे कर्जत तहसीलदार कार्यालयात दहा गावांना वितरण करण्यात आले.

सध्या सर्वत्र पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या वाटर कप स्पर्धेचे तुफान सर्वत्र आलेले आहे. कर्जत तालुक्यात भारतीय जैन संघटनेने श्रमदान करणार्‍या दहा गावांना मोफत मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. या मशिनरीला लागणार्‍या इंधनासाठी महाराष्ट्र शासनाने सहभागी गावांना दीड लाख रुपये प्रोत्साहन निधी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे तालुक्यातील दहा गावांना या निधीच्या चेकचे वितरण कर्जत येथील तहसील कार्यालायात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे या होत्या. यावेळी भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प संचालक आशिष बोरा यांनी प्रास्ताविक करताना कर्जत तालुक्यात बीजेएससह सर्व शासकीय अधिकारी व इतर सामाजिक संघटनांनी उभारलेल्या श्रमदान चळवळीचा आढावा घेताना तालुक्यातील अधिकारी या चळवळीला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत असून इतर तालुक्यात 40 हजार रुपये आगाऊ दिले जात असताना कर्जतमध्ये मात्र सर्व दीड लाख रुपये त्वरित दिले जात असल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे कौतुक केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी गेली एक महिना तालुक्यात सुरु असलेल्या श्रमदान चळवळीतील अनुभव विशद करताना सर्वांनी मेहनत घेतल्याचे म्हटले, तर सार्वजनिक वनिकरणचे सिंगल यांनी या श्रमदानातून तयार करण्यात आलेल्या सीसीटीमध्ये वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी तालुक्यात पाणी फौंडेशनचे काम म्हणावे असे वाढले नसते, मात्र सर्वच अधिकार्‍यांनी व सामाजिक संघटनांनी तालुक्यात उभारलेल्या चळवळीमुळेच हा टप्पा आज पूर्ण केला गेला असून, तालुक्यात याच काळात हागणदारीमुक्त अभियान जोरात सुरु असल्यामुळे पंचायत समितीला म्हणावा तसा सहभाग घेता आला नाही, मात्र आगामी काही दिवसांत आम्ही उर्वरित गावांना जागृत करण्याचा प्रयत्न करू असा विश्‍वास व्यक्त केला. 

कर्जतचे तहसीलदार किरण सावंत यांनी या श्रमदान चळवळीमुळे समाजातील प्रत्येक घटकाशी जवळीक निर्माण होताना काम केल्याचे समाधान मिळाले, यातून जोडले गेलेली व्यक्ती आयुष्यात विसरल्या जाणार नाहीत असे सांगताना या कामात प्रशासन सदैव आपल्याबरोबर राहील हा आम्ही पहिल्या दिवसापासून दिलेला शब्द पाळला असून या माध्यमातून तालुक्यातील विविध गावात चांगली कामे झाल्याचे म्हटले. कार्यक्रमाच्या अध्यक्षां उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांनी गावाने केलेल्या श्रमदानाचे कौतुक करताना उर्वरित कालावधीत जास्तीत जास्त गावांना या योजनेत सहभागी करून घेऊन मोठ्या प्रमाणात मशिनरी लागतील असे काम उभारूया जेणे करून अनेक गावे पाणीदार होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा यांनी आभार मानताना कर्जत तालुक्यात सुरु केलेली ही श्रमदान चळवळ अखंडपणे पुढेही सुरु ठेवण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले. यावेळी, कुंभेफळचे सरपंच काकासाहेब धांडे, बजरंगवाडीचे अंगद रुपनर, दुर्गावचे ग्रामसेवक सचिन मोकाशी, टाकळीचे ग्रामसेवक गायकवाड, कौडाणेच्या ग्रामसेविका अलका अहिरे व माजी सरपंच अनिल गंगावणे, मुळेवाडीचे सरपंच मुळे, आदींसह रोटरीचे नितीन देशमुख व डॉ. राजेंद्र खेत्रे, पोपटलाल बोरा, विनोद बोरा, यश बोरा, पिंटू शर्मा, अनिकेत खाटेर, वरद म्हेत्रे, यशवंत शिंदे उपस्थित होते.