Breaking News

लग्नसराईमुळे सराफी बाजारात तेजी


कुळधरण : आयुष्यात सहसा एकदाच होणार्‍या विवाह सोहळ्यासाठी सर्वस्व पणाला लावुन तयारी केली जाते. सोहळ्यात दागिन्यांचे विशेष महत्व असते. लग्नसोहळ्यात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा जपल्या जातात. यात वधुवरांना दागिने घालण्याची परंपरा आहे. सध्या लग्नसराईत सुरु असल्याने सोने चांदी आदी विक्रीचा सराफ व्यवसाय सर्वत्र तेजीत आहे.

लग्नसराईत सोन्या चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल होत आहे. जागतिक बाजारपेठेवर अवलंबुन असलेल्या सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅम 32 ते 33 हजाराच्या दरम्यान आहे. तर चांदीचा किलोला 40 ते 41 हजार रुपये दरम्यान दर आहे. या सर्व व्यवहारात तीन टक्के जीएसटी दर आकारला जातो. दिवसेंदिवस सोन्याचांदीच्या भावात वाढ होत आहे. लग्नसोहळ्यात वधूसाठी आवश्यक असणारे मंगळसूत्र, जोडवी, पैंजण, बिचवे, अंगठी, नथ या दागिन्यांना जास्त मागणी आहे. त्यामुळे सराफांच्या दुकानात सतत गर्दी दिसुन येत आहे. कर्जत शहरासह तालुक्यातील राशिन, मिरजगाव, कुळधरण आदी ठिकाणी सराफ व्यावसायिकांची दुकाने आहेत.लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत आहे. ग्रामीण भागात आठवडे बाजारानिमित्त आलेले लोक लग्न समारंभासाठीची खरेदी उरकुन घेताना दिसतात. जुने सोने चांदीचे दागिने मोडीत देवुन नविन खरेदी करण्याचा महिलांचा कल दिसुन येतो.


नविन डिझाइनकडे ग्राहकांचा कलसध्या ग्राहकांना सर्वच दागिन्यांमध्ये नविन व आकर्षक डिझाइनकडे कल असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने विक्रीसाठी ठेवले जातात. लग्न सराईमुळे ग्रामीण भागातही सुवर्णकारांचा व्यवसाय तेजीत आहे. गेल्या 10 वर्षापासुन कुळधरण येथे सराफ व्यवसाय करीत आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत आहे.
- अमोल टाक,
सराफ व्यावसायिक, कुळधरण