Breaking News

१३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्यात १९ कोटीहून अधिक रोपे उपलब्ध


मुंबई : लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उर्त्स्फूतपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं लावली. वन विभागाच्या वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त शासनाचा न राहता तो लोकांचा झाला. राज्यभरात २०१६ आणि २०१७ साली वृक्षलागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. आता १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत ही संधी पुन्हा सर्वांना उपलब्ध होणार आहे. राज्यात लागणार आहेत तब्बल १३ कोटी झाडं... आणि या महावृक्षलागवडीसाठी राज्यभरातील २१४२ रोपवाटिकांमधून उपलब्ध आहेत १९ कोटी ६२ लाख ९१ हजार ८२५ रोपं.. विविध प्रजातींची रोपं. ज्याला जे झाड आवडते त्याने त्या प्रजातीचे रोप लावायचे... पण रोप लावायचे आणि वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा दूत व्हायचं हे मात्र नक्की.


राज्यातील १३ कोटी महावृक्षलागवड कार्यक्रमासाठी उंच वाढलेली, उत्तम दर्जाची रोपं उपलब्ध व्हावीत म्हणून वन विभागाने अतिशय नियोजनपूर्वक पावले टाकली. राज्यात सामाजिक वनीकरण शाखा, वन विभाग, वन विकास महामंडळ, वन्यजीव मंडळ यासारख्या विविध यंत्रणांनी त्यांच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका विकसित केल्या. यामध्ये सामाजिक वनीकरण शाखेच्या ५५४ रोपवाटिका आहेत. तिथे ४ कोटी ७१ लाख ०४ हजार ०४५ रोपं लागवडीसाठी तयार आहेत. वन विभागाच्या अखत्यारित १५६९ रोपवाटिका आहेत. येथे १४ कोटी ५८ लाख १८ हजार ६३६ रोपं विकसित करण्यात आले आहेत. वनविकास महामंडळाच्या १३ रोपवाटिका आहेत. तिथे ३३ लाख ५२ हजार ७०६ रोपं उपलब्ध आहेत. रोपं लावू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाला रोपं मिळेल इतकी रोपं राज्यात उपलब्ध आहेत. यात इमारतीसाठी लागणाऱ्या लाकूड प्रजातीची रोपं आहेत,बांबूच्या विविध प्रजाती आहेत, फळझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, धार्मिकदृष्टया महत्वाची आणि मागणी असलेली रोपं देखील या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्मिळ वृक्ष प्रजातींचाही यात समावेश आहे.