Breaking News

कामगारांच्या मुलांनी प्रशासकीय अधिकारी व्हावे - कविता आव्हाड


पाथर्डी - दैनंदिन संघर्ष हा कामगारांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असून रोजच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी काबाडकष्ट करणारा हा वर्ग जीवनाची लढाई लढताना तारेवरची कसरत करत असतो. आपल्या नशिबी आलेले हे जीने आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये म्हणून कामगारांची नेहमीच धडपड असते. म्हणून कामगारांच्या मुलांनीही आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवत उच्चशिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी व्हावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या व मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविता आव्हाड यांनी केले. 

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व जनसेवा फौंडेशनतर्फे कामगार दिनानिमित्त आयोजित पाथर्डी नगरपरिषद सफाई कामगार व राज्य परिवहन कामगारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पुजा कोकाटे, सिंधुताई शेळके, नीता टेंभूरकर, नंदाताई आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड आदी उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब रंधवे यांनी प्रतिष्ठानच्या या सन्मानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बबन चौरे, सुत्रसंचालन प्रा. सुरेखा चेमटे तर आभार प्रा. वैशाली आहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. किरण गुलदागड, संजय बडे, दादासाहेब वाघ यांनी परिश्रम घेतले.