Breaking News

तरुणांनी प्रशासकीय सेवेत जावे : हिंगे


आश्वी :  ग्रामीण भागातील तरुण हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी राहत असतो. परंतू इच्छा असूनही सोयी-सुविधा अभावी प्रशासकीय सेवेत त्याला जाता येत नाही. त्यामुळे आश्वीसारख्या ग्रामीण भागातील जास्ती-जास्त तरुणांना देशसेवेसाठी प्रशासकीय सेवेत जाता यावे, यासाठी आश्वी बुद्रुक येथे माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मँन’ भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ५० हजार रुपये किंमतीच्या पुस्तकाचा लाभ घेत तरुणांनी प्रशासकीय सेवेत जावे, असे आवाहन माजी ग्रामपंचायत सदस्य विजय हिंगे यांनी केले.
ग्रामीण भागातील मुलां-मुलींमधील न्यूनगंड कमी होऊन त्यांचा स्पर्धा परीक्षेत सहभाग वाढवावा, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केद्रांच्या शुभारंभप्रसंगी हिंगे बोलत होते. हा उपक्रम सुरु करण्यासाठी मांचीहिल या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अॅड. शाळिग्राम होडगर आणि रिपाईचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नांना आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने साथ देत बाजारतळावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केद्रांची सुरुवात केली आहे. 

दरम्यान, या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रात विविध विषयांची सुमारे तीनशे पुस्तके उपलब्ध करण्यात आली. यावेळी सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, सदस्य प्रशांत कोळपकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.