Breaking News

अनधिकृत विहिरीमुळे वागदर्डी धरण कोरडे; मनमाडमध्ये पाणी टंचाई


मनमाड, दि. 14, मे - मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्या वागदर्डी धरण क्षेत्रात तब्बल 35 अनधिकृत विहिरी खोदून बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा होत असल्याने धरण अक्षरशः कोरडे पडले आहे. शहरावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, विहिरी कायमच्या बुजवाव्या, यासाठी मनमाड नगरपालिकेने चांदवड तहसीलदारांना पत्र दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाई लक्षात घेता तहसीलदार काय भूमिका घेतात, याकडे मनमाडकरांचे लक्ष लागले आहे.

मनमाड शहराची पाणीटंचाई सर्वश्रुत आहे. कधी निसर्गाने तर कधी शासनाने नाडल्याने येथील पाणीप्रश्‍न गंभीर होत आहे. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने गेल्या 40- 45 वर्षांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
समाधानकारक पाऊस न पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरले नाही. पालखेड धरणाच्या आरक्षित आवर्तनाच्या पाण्यावर शहराची तहान भागवली जात आहे. गंभीर पाणीटंचाई असतानाही वागदर्डी धरण क्षेत्रात काही शेतकरी पाण्याची सर्रास चोरी करत असल्याचे आढळले आहे. तब्बल 35 अनधिकृत विहिरी खोदल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्राच्या पाचशे मीटर आत विहीर वा बोअरवेल खोदण्यास मज्जाव असताना या विहिरी खोदल्याच कशा, तलाठ्याने परवानगी दिली कशी, 7/12 उतार्यावर त्या नोंदल्या कशा, विहिरी खोदत असताना धरणावरील कर्मचार्यांना त्या दिसल्या नाही का, पालिका प्रशासनाने खोदकाम का थांबवले नाही, कोणत्या बड्या राजकीय पाठबळावर हा प्रकार सुरू आहे, असे एक ना अनेक प्रश्‍न  उपस्थित होत आहे. 

विहिरी खोदताना ब्लास्टिंगचा वापर झाल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे. अनधिकृत विहिरी तत्काळ बुजवाव्या, अशी मागणी पत्रात केली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार असला, तरी तहसीलदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, दरवर्षी आपल्या कार्यालयास या विहिरींचा वीज पुरवठा खंडित करणे, विहिरी अधिग्रहण करणे, धरण क्षेत्रात नव्याने बोअरवेल खोदण्यास प्रतिबंध करणे, आडवे बोअर करणार्यांवर भूजल अधिनियमानुसार कडक कारवाई करणे, याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला; मात्र कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने वर्षानुवर्षे शहरास पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र भूजल ( पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनियमन) अधिनियमन 1993 व नियम 1995 अन्वये धरण, साठवण तलावा लगत 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी विहिरीस प्रतिबंध आहे. या अनुषंगाने वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या 500 मीटरच्या आतील परिसरात शेतकर्यांच्या अनधिकृत 35 विहिरींचा वीज पुरवठा त्वरित खंडित करून त्या पुर्णतः बुजवाव्या, अशी मागणी केली आहे.