Breaking News

कर्जतच्या एकात्मिक विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही - डॉ. पाटील

कर्जत / प्रतिनिधी । शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याने यापुढे कर्जतकरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. याबरोबरच, गायकरवाडी, बर्गेवाडी आणि जोगेश्‍वरवाडीचाही या वाढीव पाणीपुरवठा योजनेमध्ये समावेश करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कर्जत शहराच्या एकात्मिक विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नसल्याचेे प्रतिपादन राज्याचे गृह (शहरे) व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. यावेळी कर्जत शहरासाठी अत्याधुनिक स्वरुपाचे बहुउद्देशिय सांस्कृतिक सभागृह देण्याची पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची मागणीही डॉ. पाटील यांनी तात्काळ मान्य केली.

कर्जत शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा तसेच येथील विविध विकास कामांचा शुभारंभ नगर विकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते. त्याचबरोबर खा. दिलीप गांधी, नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, पंचायत समिती सभापती पुष्पा शेळके, प्रतिभा भैलुमे, प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, दीपक शहाणे, संजय भैलुमे, स्वप्नील देसाई, विजय तोरडमल, सुभाष तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.

कर्जतकरांसाठी पाणी आणले कोठून ?
कर्जतकरांचा शुद्ध पाणी पिण्याची तहान भागविण्यासाठी उजनी बॅक वॉटरमधून थेट पाणी योजनेद्वारे पाणी आणले आहे. या योजनेच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून आता कर्जतच्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून शहर विकासाला गती मिळाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मागील 3 वर्षात नगरपालिका आणि नगरपंचायतींना मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी देण्यात आला आहे. या राज्य शासनाने तालुका केंद्र असणार्‍या 125 ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिला. कर्जत हे शहर त्यापैकीच एक असून जवळपास 75 कोटी रुपयांची विकासकामे मागील 3 वर्षांमध्ये झाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

शहर विकासासाठी विविध कामांचे प्राधान्यक्रम ठरविले पाहिजेत, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, येथे आता पाण्याची सोय झाली आहे. त्याचबरोबर, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, अभ्यासिका, जलतरण तलाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आदींसाठी निधी निश्‍चितपणे दिला जाईल. याशिवाय, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविल्यास त्यास मदत करण्याची भूमिका डॉ. पाटील यांनी जाहीर केली.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जतकरांना दिलेले वचन पूर्ण करता आले याचे समाधान आहे. गेल्या काही पिढ्यांनी पाण्यासाठी जे भोगलं ते नवीन पिढीला भोगावं लागू नये, यासाठी या योजनेला निधी मिळवून दिला आणि मुदतीपूर्वी 17 महिन्यांतच काम पूर्ण झाले, याचा निश्‍चितपणे आनंद आहे. येत्या 20 वर्षात शहराची होणारी लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. विविध विकासकामांसाठी शहराला 43 कोटी, अंतर्गत रस्त्यांसाठी 5 कोटी लवकरच मिळतील, असेही ते म्हणाले.

नगराध्यक्ष राऊत यांनी पाणीपुरवठा योजनेचा आजपर्यंतचा प्रवास यावेळी नागरिकांना उलगडून सांगितला. पाणीपुरवठा योजनेमुळे कर्जतकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करता आल्याचे त्यांनी सांगितले. 
कर्जत शहराच्या आनंदात भर घालणार्‍या पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याकडे जाण्यापुर्वी नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील आणि पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संत सद्गुरु गोदड महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे औपचारिकरित्या लोकार्पण करण्यात आले. सर्व प्रमुख मान्यवरांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शहरातील सर्व भागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातून वाजत गाजत महिला-पुरुष येत सहभाग नोंदवला. या मिरवणुकीच्या अग्रभागी दोन झांजपथक होते. तर त्यामागे टाळकरी मुले होती. या मिरवणुकीत पालखीचा सहभाग होता. तर पाच युवती घोड्यावर कलश घेऊन पारंपारिक वेशात सामील झाल्या होत्या. त्यांचे डोक्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याने भरलेले कलश होते. त्यांचे मागे शेकडो शहरातील महिला जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याने भरलेले कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
आजपासून शुद्ध पाणी पिण्यास मिळणार या भावनेतून कर्जतकरांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे समाधान यावेळी पहावयास मिळाले.