Breaking News

पुढार्‍यांनी आर्शिवादाची पद्धत बंद करावी - ह.भ.प. निवृत्ती महाराज

अकोले (प्रतिनिधी) स्पर्धेचे युग आहे. काळ बदलला तसे आपण स्वतःहून बदल स्विकारले पाहिजे. मात्र आताच्या टिव्ही व मोबाईलच्या क्रांतीने युवक, महिलांकडील मोबाईलच्या वापराने खरोखर चांगल्या गोष्टी स्विकारल्या जातात काय? असा प्रश्‍न उपस्थित करून मुलांच्या आई-वडीलांनी वेळीच जागृत होऊन मुलींवर दडपण व चांगले संस्कार करण्याचा आशावाद व्यक्त केला. आई-वडीलांनी मुलांचे विवाह साध्या पद्धतीने साजरे करावे, वायफळ खर्च टाळावा तसेच पुढार्‍यांनी आर्शिवादाची पद्धत बंद करावी असे आवाहन समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख केले.

श्रीक्षेत्र रूंभोडी येथे 12 व्या अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तनरूपी सेवेत समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. ते पुढे म्हणाले की पुर्वी एकत्रित कुटुंबपद्धती होती. मुलींवर धार्मिक संस्कार व्हायचे. विचारांची देवाण घेवाण होत असे. त्या काळात लोक व्यसनी नव्हते. लोक देवधर्म मोठ्या प्रमाणात करत असे. करंगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते, तसे पंगतीतील पत्रावळ्या उचलण्यासाठी भक्ती पाहिजे.
सध्याच्या लगीन घाईतील आर्शिवाद, रस्त्यावरील ट्रॅफिक, वरातीतील मद्यपान यामुळे लोकांना वेठीस धरण्याचे प्रकार होतात. वेळेचे महत्व पाळणारे आपण खरोखर सुशिक्षित महाभाग आहोत काय? एकाच दिवशी अनेक विवाहामुळे गोंधळ होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते कुठे तरी थांबविण्यासाठी समाजातील नागरिकांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. सत्काराला आळा घालुन विधायक कामासाठी मदत करण्याची खरी गरज आहे.
सुशिक्षित महिलांनी आपल्या चांगल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे. मुलांना क्लासेस लावण्यापेक्षा घरी चांगला शिक्षण द्या, प्रारब्ध प्रत्येकाला आहे. जगात सर्वात हुशार राम आहे. लक्ष्मीही नम्रतेने टिकते. नाहीतर खानदान नष्ट होते. दानधर्म प्रत्येकाने परिस्थितीनुसार करावा. तरून सुनांनी व महिलांनी आपल्या माहेरच्यांशी मोबाईलवरून सतत संपर्क करण्यापेक्षा संसार सांभाळण्याची गरज आहे. या मोबाईलमुळेच मोठ्या प्रमाणात भांडणे होतात, घटस्फोटाचे कारण देखील मोबाईलच आहे, याचा गांभीर्याने विचार करा.


संकटे कितीही येऊ द्या, ते झेलण्याची ताकद ठेवा. जो संकटे, आघात पेलतो तोच घडतो. प्रत्येकाने हसुन, समाधानाने व आनंदाने रहावे. यावेळी ह.भ.प. पांडुरंग महाराज फरगडे, ह.भ.प. पांडूरंग नवले, ह.भ.प. अमोल महाराज भोत, ह.भ.प. मदन महाराज वर्पे, ट्रस्टचे अध्यक्ष दौलत मालुंजकर, लहानभाऊ मालुंजकर, बाळचंद मालुंजकर, शांताराम मालुंजकर, भास्कर सावंत, निवृत्ती सावंत, पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.