Breaking News

१०० काेटी भारतीयांच्या रक्तात भ्रष्टाचार भिनलेला

उत्तर प्रदेश सरकारला नेहमीच अाराेपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) अध्यक्ष अाेमप्रकाश राजभर यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले अाहे. १०० काेटी भारतीयांच्या रक्तात भ्रष्टाचार भिनलेला असल्याने त्याविरुद्ध लढा देणे साेपे नाही, असे विधान त्यांनी केले. ते लखनऊ येथे पत्रकारांशी बाेलत हाेते. 

राजभर म्हणाले की, भ्रष्टाचाररूपी दानव लाेकांच्या रक्तात खाेलवर भिनलेला अाहे. तसेच त्याने देशात अापले विक्राळ रूप धारण केले असल्याने या दानवांविराेधात लढणे पाहिजे तेवढे साेपे नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदींचा लाेकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उड्डाणपुलाचा एक भाग काेसळून नुकत्याच झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, समाजातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यास खूप वेळ लागेल. मात्र, पंतप्रधान माेदी हे या दानवांविराेधात एकटेच लढा देत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा उल्लेख करत त्यांनी अांध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात व केरळच्या तुलनेत उत्तर प्रदेशात याबाबत स्थिती खूप चांगली असल्याचे म्हटले. मात्र, मुख्यमंत्री याेगी अादित्यनाथ व भाजपाध्यक्ष अमित शहा हे अनुसूचित जाती-जमातीच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा अाराेपही राजभर यांनी केला.