श्रीगोंदा तालुक्यात वादळी वार्याचा तडाखा
श्रीगोंदा : तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळी वार्याचा मोठा फटका बसला असून, या वादळाचा सर्वात जास्त तडाखा चांडगावास बसला आहे. या गावातील आठ ते दहा कुटूंबांच्या घराचे पत्रे उडून लागल्याने यामध्ये अनेकजण जखमी झाले असून, यात महिला, वृद्ध, व लहान मुलांचा समावेश आहे.
जखमी नावे- प्रकाश घोडके (पोलीस पाटील), संभाजी चव्हाण, मोहन चव्हाण, सुभद्रा चाकणे, वैशाली चव्हाण, गयाबाई चव्हाण हे रात्रीच्या वादळात पत्रे उडून लागल्यामुळे जखमी झाले आहेत. तसेच या वादळामुळे या गावातील तब्बल 40 घरांची पडझड झाली आहे. तर दहा जणावरांच्या गोठ्यांचे छत कोसळले असून मोलमजुरी करणार्या सात आठ लोकांचे तर संपूर्ण घरच नेस्तनाबूत झाली आहेत. या वादळामुळे चांडगावातील अनेकांचे संसारोपयोगी साहित्यासह घरातील जीवनावश्यक वस्तू या वादळात धुळीस मिळाल्या असल्याने या गरिबांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. तर याच गावातील कैलास घोडके यांची गाभण गाई घराचा पत्रा उडून पोटात घुसल्याने जागीच ठार झाली असून गोठ्याचे छत अंगावर कोसल्यामुळे पाच ते सहा मेंढ्या दगावल्या आहेत.
तालुक्यातील पारगाव, सुरोडी, वडाळी, आढळगाव, तांदळी, हिरडगाव, काष्टी, घारगाव, शेडगाव, टाकळी कडेवळीत या गावांना देखील वादळी वार्याचा चांगलाच तडाखा बसला असुन, यामध्ये डाळींब, लिंबू या फळपिकांचे आतोनात नुकसान झाले. तसेच चिखलठनवाडी, कणसेवाडी या भागातील पॉलिहाऊस या वादळामुळे उडून गेले असून, त्यातील पिके देखील जमीनदोस्त झाली आहेत. तसेच वखारीत साठवून ठेवलेला कांदा देखील भिजल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.श्रीगोंदा शहरासह अनेक भागात रस्त्यावर मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, तसेच अनेक भागात विजेचे खांब कोलमडले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो सुरळीत होण्यासाठी अजून दोन दिवस लागण्याची श्यक्यता आहे. दरम्यान या घटनेनंतर चांडगाव येथील माजी पं. समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, रवींद्र म्हस्के, सरपंच मनीषा म्हस्के यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून नुकसान झालेल्या घरांची, पिकांची पाहणी करून या लोकांना धीर दिला, तसेच शासकीय यंत्रणेस याबाबत माहिती दिली. परंतु तहसीलदार महेंद्र महाजन हे कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी नायब तहसीलदार, सर्कल व तलाठ्यांना याठिकाणी पाठविण्यात आले, मात्र आतोनात नुकसान होऊनदेखील पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा वेळेवर न पोहोचल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच तालुक्याला एवढ्या मोठ्या स्वरूपात वादळाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
वृद्धांना अश्रू अनावर
दरम्यान या घटनेमुळे चांडगाव येथील अनेक लोकांचे प्रपंच उध्वस्त झाले असून, आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले घर या वादळाने नेस्तनाबूत झाल्यामुळे अनेक वृद्ध लोकांना अश्रू अनावर झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकार्यांचेदेखील सदर परिस्थितीने मनं हेलावली.
तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी
युवा नेते रवींद्र म्हस्के व राजेंद्र म्हस्के यांनी शासनाने विलंब न लावता तातडीने या नुकसानग्रस्त लोकांना मदत देण्याची मागणी केली असून, यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
