शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये मधमाश्यांचा मोठा वाटा- कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा
राहुरी - मधुमक्षिका हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. झाडांच्या व पिकांच्या परागीभवनामध्ये 80 टक्के वाटा हा मधुमक्षिकेचा आहे. वनस्पतींचे अस्तित्व आणि जैवविविधता टिकवण्यामध्ये मधमाशांचा मोठा वाटा आहे. मधुमक्षिका पालनामुळे पीक उत्पादन ४०-९० टक्क्यापर्यंत वाढविणे शक्य आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये मधमाश्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि किटकशास्त्र विभागांर्तगत जागतीक मधुमक्षिका दिनानिमित्त शास्त्रीय पध्दतीने मधुमक्षीका पालन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील प्रगतशील मधमाशीपालक श्री. दिनकर पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, अहमदनगर आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. भाऊसाहेब बर्हाटे, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम होले उपस्थित होते. कुलगुरु पुढे म्हणाले, मधुमक्षिका संगोपन ही काळाची गरज ठरत आहे. शास्त्रीय दृष्ट्या मधुकक्षिका पालनामुळे शेतकर्यांना परागीभवना व्यतीरीक्त मध, मेन, जेली इत्यादी पदार्थातून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. जमिनीखालील किटक गांडुळ आणि जमिनीवरील किटक मधमाशी हे शेतकर्यांचे सर्वात जवळचे आणि शेतकर्यांच्या उत्पन्नात भर पाडणारे मित्र आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे मधमाशीपालक श्री. दिनकर पाटील म्हणाले, मधमाशा आपले मित्र आहे. मधुमक्षिका पालनामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालन मिळू शकते. व्यापारी दृष्टीकोनातून मधुमक्षिकापालन करावे. मधुमक्षिकापालनातून मध, मेण आणि पराग मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतात. पराग कणांमध्ये सर्वात जास्त प्रथीने असल्याने त्यास जगभरात मोठी मागणी आहे. मधुमक्षिकापालन हा पुरक व्यवसाय नसून पूर्ण वेळ करण्याचा व्यवसाय आहे. यावेळी संचालक संशोधन डॉ. शरद गडाख म्हणाले, सध्या देशात 80 लाख मधुमक्षिका पेट्यांची गरज असून देशात 10 ते 15 लाख मधुमक्षिका पेट्या उपलब्ध आहे. यामुळे देशात मधुमक्षिका पालनाला मोठा वाव आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी मधुमक्षिका पालन हे सोपे तंत्र आहे. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, आत्मा प्रकल्पसंचालक श्री. भाऊसाहेब बर्हाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि स्वागत विभाग प्रमुख डॉ. उत्तम होले यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार डॉ. पल्लवी पाळंदे यांनी मानले. या कार्यशाळेला विविध विभागांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, शेतकरी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
