धारदार शस्त्रांसह तीन आरोपीना संगमनेर पोलिसांनी केली अटक
संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी 'मिशन ऑल आऊट' अंतर्गत कारवाई करत आज रविवार दि.२० रोजी मध्यरात्रीतून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून धारदार शस्त्रांसह तीन आरोपी ताब्यात घेतले असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून रात्री दोनच्या सुमारास शहरातील लक्ष्मीनगर भागातून आरोपी निलेश देविदास मोहारे वय-२३ याला त्याच्या राहत्या घरून एक फूट लांबीचा चाकू व दोन फूट लांबीचा जंब्या अशी दोन धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत पहाटे चारच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाला अकोले बायपास येथील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे दोन संशयितांना दुचाकीवरून टेहळणी करताना आढळली असता त्यांच्याकडे दोन फुटाची धारदार तलवार मिळून आली आहे. जालिंदर नवनाथ बोराडे वय-२२ रा. जाफराबाद ता. श्रीरामपूर व सुनील संजय खोडसणे रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडील असलेले हत्यार आणि पल्सर गाडी क्र. एमएच १४ सीआर ७७५४ हस्तगत करण्यात आली असून शहर पोलिसांनी या तिघाही आरोपींविरुद्ध आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी विजय खाडे व दत्तात्रय गोरे करीत आहे.
