Breaking News

पोलिसांच्या शासकीय निवासस्थानांची बांधकामे वेगाने पूर्ण करण्याचे डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश


मुंबई : राज्यातील पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाच्या बांधकामाची कामे वेगाने पूर्ण करावीत. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे कार्यादेश पोलीस गृहनिर्माण महामंडळाने तातडीने देऊन कामे सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी आज येथे दिले.
पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत राज्यात विविध ठिकाणी पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने बांधण्यात येत आहेत. यासंदर्भात आज डॉ. पाटील यांनी आढावा बैठक घेतली. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून कार्यादेश देणे बाकी आहे. यासंदर्भात डॉ. पाटील यांनी तातडीने कार्यवाही करून कामास सुरूवात करण्याचे निर्देश दिले. तसेच अकोला जिल्ह्यातील खामगाव, निंबोणीसह इतर ठिकाणच्या शासकीय निवासस्थानांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या जिल्ह्यातील प्रकल्पांची प्रशासकीय मंजुरी प्रलंबित आहे, त्यांनाही तातडीने गृहनिर्माण महामंडळाने मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक दीपाली मासिरकर, अकोल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.