Breaking News

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने दर्जेदार शेती उत्पादनांसाठी पर्याय उपलब्ध करावेत


मुंबई : शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, शेती अवजारे आदी शेती उत्पादने दर्जेदार मिळावीत, यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने पर्याय उपलब्ध करून द्यावेत. तसेच महामंडळाचा नफा वाढविण्यासाठी प्रभावीपणे कामे करण्याच्या सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते.

महामंडळाच्या कामाचा वार्षिक आढावा घेऊन श्री. फुंडकर म्हणाले की, महामंडळाचा नफा वाढविण्यासाठी व्यावसायिक धोरणे आखण्यात यावीत. महामंडळाच्या विपणन पद्धतीची पुनर्रचना करावी. नागपूर संत्रा उत्पादक संघाच्या (नोगा) उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी विविध योजना सुरु कराव्यात.

यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकर यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.