Breaking News

कर्जत तालुक्यात भीमा नदी बनली गटारगंगा नदीकाठच्या गावांतील आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

जिल्ह्यातील कारखानदारीतून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी भीमानदीपात्रातच सोडले जात असल्याने नदीपात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. प्रदूषित पाण्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांवर झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

राजगुरुनगर, दौड आदी भागात वाढलेल्या अनेक कारखान्यांतील प्रदूषित पाण्याचे उत्सर्जन भीमा नदी पात्रातच होते. तसेच या भागातील मोठ्या नागरी वस्त्या असलेल्या गावांचे सांडपाणीही थेट भीमा नदी पात्रातच सोडले जात आहे. वाढलेली जलपर्णी पाण्यातच कुजल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली जात आहे.कर्जत तालुक्यातील सिद्धटेक, गणेशवाडी, खेड, दुधोडी आदी गावातील नागरिक या प्रदूषणाने हैराण झाले आहेत.जलपर्णी पाण्यात कुजल्याने पाणी काळपट रंगाचे बनले असून पाण्यात लाल, काळ्या रंगाच्या अळ्या तयार झाल्या आहेत. नदीपात्राच्या या बकाल अवस्थेने या भागाच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही दूषित बनले आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. शेतीसाठी नदीपात्रातून पाण्याचा उपसा केला जातो, मात्र रासायनिक घटकांनी विषारी बनलेल्या पाण्याचा त्वचेशी संपर्क आल्यास नागरिकांच्या अंगाला खाज सुटते तसेच त्वचाविकार जडतात. प्रदूषित पाण्यामुळे माशांची पुनरुत्पादन प्रक्रिया रोडावली असून त्याचा मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.नदीकाठच्या गावांचा पाणी शुद्धीकरणाचा पश्‍न कायम असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.राज्यभरातून सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी सिद्धटेक येथे येणारे पर्यटकही दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. निसर्गाचे वरदान लाभलेली नदीकाठची गावे आता प्रदूषणाने व्यथित झाली असली तरी, शासनयंत्रणा प्रदूषणनियंत्रणा बाबत सुस्त असल्याचे दिसते.


नदी झाली गटारगंगा
नदीपात्रात मिसळतेय लाखो लिटर पाणी
भीमानदी म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटार
नदी काठच्या गावांचे आरोग्य धोक्यात
जलपर्णी कुजल्याने पाण्यात बनल्या अळ्या
प्रदूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात