Breaking News

जामखेडच्या शेतकर्‍याची सोलापूर बाजार समितीकडून फसवणूक दोन महिण्यापुर्वी विकला कांदा

जामखेड / श. प्रतिनिधी ।  येथील शेतकर्‍याची सोलापूर बाजार समितीकडून फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने, शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकर्‍यास कांद्याचे पैसे देण्यास चार महिन्यांनंतरही टाळाटाळ केली जात आहे. 


जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शेतकरी बाळू बाबू लांडे यांनी सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एम.आय कल्याणी या आडत व्यापार्‍याकडे दि. 12 फेब्रुवारी रोजी 62 गोण्या कांदा विकला, त्याची विक्री किंमत 48174 इतकी झाली होती. त्यापैकी 40 हजार रुपयांचा चेक सदर व्यापार्‍याने शेतकर्‍यास दिला. सदर चेक बँकेत भरला असता खात्यात पैसे नसल्याने तो परत आला, याबाबत शेतकर्‍याने संबंधित आडते व्यापार्‍याकडे चार महिन्यापासून पैशांच्या चौकशीकरिता संपर्क न होऊ शकल्याने शेतकर्‍याने सोलापूर गाठले, तेथेही सदर आडते व्यापार्‍याचे दुकान बंद असल्याने भेट झाली नाही. हवालदिल शेतकर्‍याने बाजार समितीच्या सचिवांना कांदा विकल्याचे व चेक दिल्याचे कागदपत्रे दाखवून हकिगत सांगितली, मात्र सचिवांनी आमचा व आडते व्यापार्‍याचा काही संबध नाही. तुम्हाला बाजार समिती पैसे देऊ शकत नाही, असे असमाधानी व उडवा-उडवीची उत्तरे दिली. आपले कष्टाचे पैसे गेल्याने सदर शेतकर्‍याने जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांना हकिगत सांगितली. पदाधिकार्‍यांनी सोलापूर बाजार समितीकडून माहिती घेतली असता त्यांनाही ती आमची जबाबदारी नाही, शेतकरी आणि व्यापारी बघून घेतील असे बेजाबदार उत्तर दिले. चार महिने उलटूनही शेतकर्‍यास कांद्याचे पैसे मिळाले नाहीत याबाबत राजकिय पदाधिकारी लक्ष घालतील का हा प्रश्‍न आहे.

बाजार समितीच्या नियमानुसार वजन झाल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकर्‍यास मालाचे पैसे देण्यात यावे असे निर्देश आहेत. परंतु सोलापूर बाजार समितीकडून बाळू बाबू लांडे या शेतकर्‍यास मिळालेली वागणूक चूकीची आहे. आम्ही बाजार समितीला पत्रव्यवहार करून वरिल शेतकर्‍याचे कांद्याचे पैसे तात्काळ देण्याबाबत बाजार समिती जबाबदार असल्याचे दाखवून दिले आहे. शेतकर्‍याची व्यापार्‍याकडून अडवणूक होत असल्यास, बाजार समितीने दखल घेवून शेतकर्‍यांचे हित जोपासणे गरजेचे आहे. सदर शेतकर्‍यास पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहेत.
-करण ढवळे
संचालक बाजार समिती, जामखेड