अहिल्यादेवींची जयंती चौंडीलाच साजरी करणार : भिसे
जामखेड : पालकमंत्री राम शिंदे व महादेव जानकर हे भाजप सरकारमध्ये असेपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. पालकमंत्री राम शिंदे यांनी चौंडी येथील होणारी जयंती हायजॅक केली आहे. बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती ही आम्ही चौंडी येथेच साजरी करणार आहोत. यासाठी आम्हाला तुरुंगात बसण्याची वेळ आली तरी चालेल असे डॉ. इंद्रकुमार भीसे यांनी सांगितले.
जामखेड पोलिस प्रशासनाने चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करू नये यासाठी, बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना 149 ची नोटीस जारी करण्यात आली आहे. या अनुशंगाने सोमवारी (28) सायंकाळी जामखेड येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी डॉ. इंद्रकुमार भिसे बोलत होते. यावेळी दत्ता करे, शिवाजी वाडीकर, विनोद काळे, प्रा. अप्पासाहेब पालवे, भगवान जर्हाड उपस्थित होते.
दि. 31 रोजी तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव मोठ्या थाटात होत आहे. यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित होणार्या या उत्सवाची पालक मंत्री राम शिंदे सध्या जोरदार तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा कामाला लावलेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी देखील चौंडी येथे दुसर्या ठिकाणी बहुजन समाजास एकत्रित घेऊन जयंती साजरी करण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना 149 ची नोटीस काढली आहे. सदर जयंती हाणून पाडण्यासाठी डाव आखला असून, यामागे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा हात आहे. मात्र तरी देखील आम्ही चौंडी येथेच अहिल्यादेवींची जयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
