Breaking News

व्यापार्‍याचा दोरीने गळा आवळून खून


कर्जत : मुंबई येथील फळ व्यापार्‍याने विकत घेतलेले ट्रकभर टरबूज परस्पर विकण्याच्या मनसुब्याने, व्यापार्‍याचा दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह खेड येथील भीमा नदी पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मयत व्यापारी हसन उमर शेख (वय-50) यांची पत्नी जैबून हसन शेख (वय-45) वर्षे रा. न्यू कलेक्टर कंपाउंड, मुंबई यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील मोहन कुंडलिक भोरे यास अटक केली असून त्याचे इतर दोन साथीदार पसार झाले आहेत. त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळू अशी माहिती पो. नि. राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

या बाबत जैबून शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती हसन गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मुबई येथे ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडून फळे खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहे. गेल्या 19 मे 2018 रोजी ते मुंबई येथून बीड कडे जातो असे सांगितले. त्यानंतर नियमित त्यांचा माझा संपर्क होता. दि. 24 रोजी त्यांनी मला फोन करून सांगितले की, मी परळी येथील शेतकर्‍याकडून टरबूज खरेदी करून अर्धी ट्रक भरली आहे. माल खरेदीचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर टाक असे सांगितले. या वेळी मी एक लाख दहा हजार रुपये टाकले नंतर सदरचे टरबूज पूर्वी माल घेऊन येणारा मोहन गोरे यांच्या ट्रकमध्ये आणत आहे, त्यास डिझेलसाठी दहा हजार रुपये दिले असल्याचे सांगितले. तसेच आणखी माल घेण्यासाठी खात्यावर ऐंशी हजार रुपये टाकण्यासाठी सांगितले, त्यानुसार मी पैसे त्यांचे खात्यावर टाकले. त्यानंतर दि. 25 रोजी मी आष्टी तालुक्यात एजंट पप्पू चांद पठाण यांचे मध्यस्थीने आणखी माल घेतला असून ट्रक भरीत आहे असा फोन आला. त्यानंतर त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर दि. 26 रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत ट्रक न आल्याने जामखेड येथील एजंटला फोन करून चालकाचा फोन नंबर घेतला. चालकाला फोन केला असता ट्रक जागेवरच आहे. तुमचे मालक आमचे बरोबर आले नाहीत.त्यांना मी आष्टी बस स्थानकावर त्यांना सोडले आहे. मी ट्रक घेऊन येत नाही तुम्ही दुसर्‍या वाहनातून माल घेऊन जा असे सांगण्यात आले. 

त्यानंतर नातेवाईक व जामखेड पोलिसांच्या मदतीने चालक भोरे यास गाठले. त्यावेळी मालाने भरलेली ट्रक दिसली. त्यानंतर आष्टी पोलिसाकडे पती हरविल्याची फिर्याद दिली. त्यावेळी तेथील एजंटने सांगितले की चालक भोरे हा टीमच्या पतीला दमबाजी करीत होता. तसेच ते पुढे इतर दोघे, चालक आणि तुमचे पती यांनी माहिजळगाव येथे एकत्र जेवण घेतले. त्यावेळी आष्टी पोलिसांनी सांगितले की कर्जत तालुक्यात मुस्लीम पुरुषाचे प्रेत सापडले आहे. महिलेने कर्जत येथे शासकीय रुग्णालयात येऊन ते पहिले असता पतीचे प्रेत असल्याची खात्री पटली. तसेच त्यांच्या गळ्यावर दोरीने आवळ्याच्या खुणा दिसल्या. त्यांच्या जवळील एटीएम कार्ड, पैसे, मोबाईल आढळून आले नाही. दि. 25 चे रात्री आठच्या नंतर पती हसन यांचा ट्रक ड्रायव्हर आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने खेडनदी पात्रात टाकला. या फिर्यादी वरून कर्जत पोलिसांनी चालक मोहन भोरे यास अटक करून त्याच्यासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.