Breaking News

आरोप प्रत्यारोपाने मुळा टेलचा पाटपाणी प्रश्‍न पेटला


भाविनिमगाव - पाणीवापर संस्था स्थापनेपासून टेल टु हेड भरणे काढण्याचा पाटबंधारे खात्यानेच नियम केला. मात्र आज परीस्थिती अशी आहे की टेलच्या पाणी वापर संस्थांना पाणीच मिळत नसुन हक्काच्या पाटपाण्यासाठी टेलच्या शेतकर्‍यांना दर आवर्तनाला संघर्ष करावा लागतोय. संघर्ष करूनही सर्व शेतकर्‍यांना पाटपाणी मिळत नसुन टेलच्या शेवटच्या शेतकर्‍यांला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार, प्रसंगी उपोषणचा मार्ग स्वीकारावा लागला तरी बेहत्तर मात्र मुळाचे पाटपाणी टेलच्या शेतकर्‍यांना मिळालेच पाहिजे. यासाठी संघर्ष अधिक तीव्र करणार असल्याचे ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अ‍ॅड. अनिल मडके यांनी सांगितले. 

मुळा धरणाचा टेलचा भाग हा जायकवाडी प्रकल्पग्रस्त भाग असुन शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी आपल्या शेतीवाडीचा गावाचा त्याग केलेली ही जनता आता कुठे सावरली असुन शेती करत आहे. या टेलच्या भागात मुळाचे पाटपाणी मिळते. पाणी मिळण्यासाठी या भागावर अन्याय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने पाणी वापर संस्था उभ्या केल्या आणि आज परीस्थिती अशी आहे की पाटबंधारे विभागाकडूनच या संस्थांना पाणी देण्यात टाळाटाळ होत असुन अधिकारी आपला मनमानी कारभार करून शेतकर्‍यांचा अंत पाहत आहे. आठ दिवसांपुर्वी रास्तारोको आंदोलन केले . त्यात पाटबंधारे अधिकार्‍यांनी दोन दिवसात पाणी देतो असे आश्‍वासन दिले मात्र आठ दिवस उलटले तरी पाणी नाही. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी एका पाण्याला पारखा होत असुन ज्या उद्देशाने पाणी वापर संस्था स्थापन केल्या. त्याचा पार बट्ट्याबोळ झाला असुन अधिकारी वर्ग मात्र संस्था संचालक व शेतकर्‍यांना सापत्न वागणूक देत असल्याने टेलच्या भागात प्रत्येक आवर्तनाला प्रतिक्षाच करावी लागते. आवर्तन सुटुन 25 दिवस उलटले तरी चार्‍या ओल्या झाल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उष्णतेच्या तडाख्यात पिके करपत असुन शेतकरी चिंताग्रस्त असुन आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. आणि टेलच्या भागातील शेतकर्‍यांना येत्या पाच सहा दिवसात पाटपाणी न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन प्रसंगी उपोषण करण्याचा इशारा टेलच्या भागातील विविध संस्थेचे पदाधिकारी, शहरटाकळी सेवा सोसायटी उपाध्यक्ष प्रशांत वेलदे, संतोष शेटे , राजेंद्र काकडे, प्रविण बरबडे, मजलेशहर माजी सरपंच विक्रम लोढे, अप्पासाहेब फटांगरे, मठाचीवाडी सरपंच सतिष धोंडे, सेवा सोसायटी अध्यक्ष बबन जगदाळे, माजी सभापती बाळासाहेब धोंडे, बक्तरपूर मधुन कृ. ऊ. बा. समिती अध्यक्ष मारुतराव जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, देवटाकळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव खरड, उपसरपंच अशोक मेरड, संतोष मेरड आदींनी ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरटाकळी सेवा सोसायटी अध्यक्ष अ‍ॅड. अनिल मडके यांच्या पुढाकाराने पाटपाणी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.