Breaking News

विचारपूर्वक निर्णय घेऊन पावले टाकावीत : कोल्हे .


कोपरगाव ता. प्रतिनिधी - बाजार समिती ही शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था आहे. येथे राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतक-यांच्या विकासावर भर द्यावा. सर्व संचालकांनी एकोपा ठेवावा. तत्कालीन सभापती, विधीज्ञ नानासाहेब चांदगुडे यांच्या कार्यकाळात राहाता येथे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी बाजार समितीसाठी मोठया प्रमाणात जागा खरेदी केली. त्याचा आज त्या भागातील शेतक-यांना मोठा फायदा झाला आहे. त्याप्रमाणे कोपरगांवातही भविष्यात निर्माण होणा-या परिस्थितीचा सभापती आणि उपसभापतींनी विचारपूर्वक निर्णय घेऊन पुढील पावले टाकावीत, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. 

येथील बाजार समितीच्या सभापतीपदी कोल्हे गटाचे संभाजीराव रक्ताटे तर उपसभापतीपदी काळे गटाचे राजेंद्र निकोले यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक आर. एल. त्रिभुवन यांनी काम पाहिले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती रक्ताटे व निकोले तसेच माजी सभापती मधूकर टेके व माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संजीवनीचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले, माजी गटनेते केश भवर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात आदींसह बाजार समितीचे सर्व संचालक शेतकरी तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष रामदास राहणे विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सभापतीपदासाठी संभाजी रक्ताटे यांच्या नावाची सूचना बापूसाहेब सुराळकर तर उपसभापतीपदासाठी राजेंद्र निकोले यांच्या नावाची सुचना मधूकर टेके यांनी मांडली. सचिव परशराम सिनगर यांनी आभार मानले.