Breaking News

वन विभागातर्फे पुण्यात लवकरच जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर उभारण्यात येणार


पुणे - वनाच्छादनामुळे होणारा बदल, अवैध वृक्षतोड, वनीकरण, वणव्यांचे नियंत्रण, वन्यजीवांचे ठिकाण निश्‍चित करणे, मानव-वन्यजीव संघर्ष यासारखी खडा न् खडा माहिती गोळा करण्यासाठी वन विभागातर्फे पुण्यात लवकरच जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर (जीआयएस) उभारण्यात येणार आहे. यासाठीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ‘जीआयएस’द्वारे पश्‍चिम महाराष्ट्रातील जंगलांमधील वनसंपत्ती, वन्यजीवांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

वनसंपत्ती, वन्यजीवांवर नजर ठेवण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव यांच्या वतीने देण्यात आली होती. त्यानुसार पूर्व विभागासाठी नागपूर येथे तर पश्‍चिम विभागासाठी पुणे येथे ‘जीआयएस’चे केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पुणे विभागातील जीआयएस सेंटरचे काम सुरू झाले असून येत्या जून महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती वनविभागाचे विशेष कार्य अधिकारी अरविंद आपटे यांनी दिली.