Breaking News

डिजिटल बोर्ड लावणे बंद; ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक ठराव

जामखेडमधील दुहेरी हत्याकांडाचे पडसाद दुसर्‍या दिवशीही उमटले. दुसरया दिवशी सकाळपासून जामखेड बंद ठेवून संतप्त महिलांनी व नागरिकांनी कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला, तर दुसरीकडे भोंगळ कारभारामुळे ग्रामीण रुग्णालयास कुलूप ठोकले. 

दरम्यान महावीर मंगल कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत यापुढे शहरामध्ये डिजिटल बॅनर न लावण्याचा ऐतिहासिक ठराव झाला. जामखेडमधील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी सर्वपक्षीय, संघटना, व्यापारी, प्रशासन, समस्त नागरिकांची अभुतपूर्व ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेसही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासन व राज्यकर्ते दहशत वाढीसाठी कसे कारणीभूत आहेत, हे कडव्या अनूभवातून सांगितले. जामखेडमध्ये सराईतचे, तडीपारीचे, 307, सारख्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस प्रशासनांसमोर राजरोसपणे फिरत आहेत. अनेक गुन्ह्यातील आरोपी अटकपूर्व जामीन न घेता कोणाच्या जोरावर फिरत आहेत. हा मोठा प्रश्‍न सतावत आहे. शहरात बाहेरच्या गुन्हेगारी टोळ्या कोणाच्या इशार्‍यावर येतात? का येतात? याचे गांभीर्याणे चिंतन करून हल्लेखोर कोणीही असोत, त्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रशासनास, राज्यकर्त्यांना धारेवर धरले पाहिजे. भविष्यात दादागिरी, दहशत मोडून काढण्यासाठी समविचारी नागरिकांस, तरूणांना बरोबर घेऊन गावासाठी एकत्र मोट बांधून विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांचा बीमोड करण्यासाठी एकत्र येण्याचा या ग्रामसभेत ठराव झाला. सदर हल्लेखोरांचे व भविष्यात अशा गुन्हेगारांचे वकिलपत्र घेणार नसल्याचे वकिल संघाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले. 
गुन्हेगारांना वाचविण्यासाठी शिफारस करणार्‍या राजकीय लोकांचे नाव पोलिसांनी यापुढे जाहीर करावे, तसेच यापुढे शहरात धार्मिक वगळता कोणतेही डिजिटल बोर्ड लागणार नाहीत, असा एकमुखी ठराव झाला.
हल्लेखोरांवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली. ती गुंड बनवणारी ती तालिम बंद करणे, कोणत्याही जाती धर्माच्या माणसांवर अन्याय झाल्यास सर्व ग्रामस्थांनी न्यायासाठी एकत्र येण्याचा निर्णय देखील यावेळी घेतला गेला. वाकी येथील प्रकरणात पो.कॉ. पवार यांनी खोटी पिस्तूल दाखवली याबद्दल त्यांना सहआरोपी करावे आदी ठराव मांडण्यात आले.