Breaking News

कुक्कुटपालन व्यवसायाने शिंदे कुटूंबाला दिलासा


कुळधरण : कुक्कुटपालन व्यवसायाने कर्जत तालुक्यातील शिंदे येथील शिंदे कुटुंबास चांगलाच दिलासा मिळाला आहे. गेली दोन दशके या व्यवसायात चांगला जम बसवत अरुण शिंदे व सुरज शिंदे या पितापुत्रांनी अर्थार्जनाचे मुख्य साधन बनविले आहे. अनेक अडचणींवर मात करुन आता अनुभवाच्या शिदोरीवर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी, शेळीपालन व दुग्ध व्यवसाय हे प्राधान्याने केले जातात. त्याचबरोबर गावठी कोंबड्यांची पिल्लं पाळून त्यांचे संगोपन करण्याचा व्यवसायही अनेकजण निवडतात. अंडी तसेच मांस विक्रीच्या उद्देशाने हा व्यवसाय केला जातो. मात्र सतत हवामानात होत असलेल्या बदलामुळे व वाढत्या तापमानामुळे कुक्कुटपालन शेडमधील पक्षी मरण पावतात. ढगाळ वातावरण, अती पर्जन्य, कडाक्याची थंडी तसेच अती उष्ण तापमान यामुळे या व्यवसायाला अडचणी येतात. बदलत्या वातावरणामुळेही कुक्कुटपालन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात धोका असतो. बॉयलर जातीच्या पक्षांच्या वाढीसाठी थंड हवामान गरजेचे असते. मात्र अनेकदा पोषक हवामान नसल्याने पक्षांचा मृत्यू होतो व व्यवसायाला घरघर लागते.


बदलत्या हवामानापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी कुक्कुटपालन व्यावसायिकांना विविध क्लुप्त्यांचा वापर करावा लागतो. कुक्कुटपालन शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदाना, नारळाच्या झाडाच्या फांद्या टाकुन उन व थंडीपासून संरक्षण केले जाते. पक्षांना बाधा आणणारी रोगराई, त्यावरील लसीकरण, पक्षांचे खाद्य, पाणी या सर्व बाबी या व्यवसायात अधिक महत्वाच्या असतात. माल तयार झाल्यानंतर त्याची विक्री वेळेत करणे हेही तितकेच महत्वाचे असते. मात्र शिंदे कुटुंबाने या सर्व बाबींवर अनुभवातुन मात करीत या व्यवसायात आपले नाव तयार केले आहे. पुणे, मुंबई येथील व्यापार्‍यांना प्रामुख्याने त्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री केली जाते.


दर महिन्याला 5 हजार पक्षांची विक्रीकोपर्डी येथे चार स्वतंत्र शेड उभारून 20 वर्षापुर्वी व्यवसाय सुरु केला.अगोदर बुकिंग करुन कडा येथून एक-दोन दिवसाच्या डीपी गावरान पिलांची विक्री केली जाते. सात, चौदा, एकवीस, अठ्ठावीस दिवसांनी नियमित लसीकरण करुन घ्यावे लागते. एका शेडमध्ये पाच हजार पक्षांचे संगोपन केले जाते. 85 ते 90 दिवसात माल विक्रीसाठी तयार होतो.चार शेडमध्ये व्यवसाय सुरु असुन, दर महिन्याला पाच हजार पक्षांची विक्री पुणे तसेच मुंबईला केली जाते. वेळेत लसीकरण, खाद्य, पाणी आदी उपलब्ध करुन देत काळजीपूर्वक पक्षांचे संगोपन करावे लागते.
- सुरज अरुण शिंदे,
शिंदे पोल्ट्री फार्म, शिंदे, ता. कर्जत