Breaking News

ठेकेदारीसह विकासकामांवरून आजच्या सभेत पालिकेत होणार खल

सातारा दि. 28 (प्रतिनिधी) : शहरात विकासाची मोठी कामे सुरू असताना पाणी-कचर्‍याचा प्रश्‍न मात्र पेटला आहे. आज पालिकेत होणार्‍या सर्वसाधारण सभेत शिर्के शाळा मैदान, बिव्हीजीला घरकुलचा निधी यासह कर्मचारी भरती ठराव आणि निवृत्त कर्मचार्‍यांना 40 टक्के वाढीव वेतन देण्याचे विषय घेण्यात आले आहेत. बोकाळलेली ठेकेदारी आ णि पालिकेचे सांगोपांग धोरण याच्यासह विविध विषयांवर खल होणार असला तरी पालिकेच्या मिळकती आणि भाडे निश्‍चिती हाही कळीचा मुद्दा ठरणार असल्याने आजच्या वादळी सभेकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

पालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्याला घ्यावी, असा कायदा असताना दीड महिन्यांनी ही सभा होत आहे. अशातच विरोधकांचे विषय सभेत घेतल्याने ऐनवेळी अजेंडा बदलण्यात आला. मागील सभेतील तहकूब विषय काढण्यात आले असले तरी सदरबाझर येथे बांधलेल्या घरकुलाच्या मेंटेनन्सपोटी बिव्हीजीला 15 लक्ष देण्याचा विषय घेण्यात आला आहे. शिर्के शाळा मैदान भाड्याने देण्याचा ठराव मागील सभेत घेतला असला तरी पुन्हा बॅडमिंटन कोर्टसाठी 15 लक्ष खर्ची टाकण्याचे विषय पत्रिकेत घेण्यात आले. क र्मचारी भरती आणि निवृतांना 40 टक्के अंशदान कोणत्या तरतुदीनुसार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कास तलावाला छ. प्रतापसिंह महाराज थोरले आणि राजवाडा पाणी टाकीला माजी उपाध्यक्ष संजय जोशी यांचे नाव देण्यात येणार आहे. 
दरम्यान, कास धरणाचे बांधकाम सुरू असताना पालिका मालकीच्या बंगल्यात अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत संबंधितांकडून भाडे आकारणी करताना वेळप्रसंगी फौजदारी करणे संयुक्तिक असूनही कोणी ब्र शब्द काढत नसल्याने सत्ताधार्‍यांना विरोधक मॅनेज झाले का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.