Breaking News

‘नाणार’ अधिसूचना अजूनही रद्द नाही

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या निर्णयाला केराची टोपली दाख विल्याचे समोर आले आहे. नाणार रिफायनरी बाबत काढण्यात भूसंपादनाची अधिसूचना अजूनही रद्द करण्यात आली नाही. नाणार प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेशी चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज माहिती दिली आहे. नाणार येथील सभेत दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार भूसंपादन अधिसूचना रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र लगेचच मुख्यमंत्र्यांनी देसाई यांना असे अधिकारच नसल्याचे सांगून शिवसेनेला चांगलीच चपराक दिली होती. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही भूसंपादन अधिसूचनेचे पडसाद उमटले होते. त्यावेळी ती अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र उद्योगमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मात्र याबाबत आज मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता अजून ती अधिसूचना रद्द झाली नसल्याची त्यांनी माहिती दिली. तसेच अजूनही स्थानिक जनतेशी चर्चा सुरुच असल्याचे त्यांनी सांगितले.