Breaking News

प्रभारीराज असतांनाही विकासकामांचा डोंगर : कदम


राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपाने सत्‍ता स्‍थापन केल्‍यानंतर अवघ्‍या दीड वर्षात कोटयावधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. मध्‍यंतरीच्‍या काळात तत्कालिन मुख्‍याधिकारी यांनी प्रशासकीय कामे धिम्‍या गतीने केल्‍याने विकास कामांना खीळ बसली होती. मुख्‍याधिका-यांची बदली झाल्‍यानंतर प्रभारी मुख्‍याधिका-यांच्‍या अधिकाराखाली विकास कामांनी जोर धरला आहे. प्रभारीराज असले तरी विकास कामांचा डोंगर उभा राहात आहे, असे नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम पाटील यांनी सांगितले. 
ते म्हणाले, आजमितीला शहरातील अनेक रस्‍त्‍यांची व गटारी, पाणीपुरवठा, एक्‍सप्रेस फिडर, जलसंधारण, सौर ऊर्जा आदी कामे पूर्णत्‍वास जात आहेत. यापूर्वीच्‍या काळात राहुरी कारखाना परिसराला सवतीची वागणूक दिली जात असल्याचा नागरिकांचा समज होता. परंतु जलतरण तलावसारखा मोठा प्रकल्‍प राहुरी कारखाना परिसरात उभारण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे येथील नागरीकांचा गैरसमज दुर होईल. 

दरम्‍यानच्‍या कालावधीत बरेच दिवस व वेळ वाया गेला. त्‍यातच तत्‍कालीन मुख्‍याधिकारी यांनी अनेक विकासकामांना खोडा घातला होता. प्रशासकीय कामकाज धिम्‍या गतीने होत असल्‍याने त्‍यामुळे ब-याचशा विकास कामांना खीळ बसली होती. परंतु आज रोजी शहरातील बहुतांशी प्रभागात विकास कामे जोरदार चालू आहेत. शहरातील नागरिकांची मागणी बघता रस्‍ते, पाणी आणि गटारी आदि कामे प्राधान्‍याने हाती घेण्‍यात आली. त्‍यानंतर शहरातील रस्‍त्‍यावरील पथदिवे, खुल्‍या व्‍यायामशाळा, जलतरण तलाव आदी कामे लवकरच हाती घेण्‍यात येतील.