Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखले : कोल्हे

कोपरगांव : शहर प्रतिनिधी  - तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची विजयी घौडदौड कायम सुरू आहे. थेट जनतेतून निवडल्या गेलेल्या सरपंचपदी आजपर्यंत झालेल्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कोल्हे गटाने वर्चस्व राखले आहे, असे प्रतिपादन औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीपैकी कारवाडी, चांदगव्हाण, दहेगांव बोलका, लौकी आणि घोयेगांव या पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाप्रणित कोल्हे गटाचे उमेदवार विजयी झाले. या यशाबद्दल नूतन सरपंचांचे येथील संजीवनी पतसंस्था कार्यालयात अभिनंदन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात व शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी घोयेगांव ग्रामपंचायतीचे अपक्ष सरपंच उमेदवार दादा भाटे यांनी कोल्हे गटात प्रवेष केला. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.


कोल्हे गटाचे पाच आणि काळे गटाचे चार

दरम्यान, नऊ ग्रामपंचायतींपैकी कारवाडी, चांदगव्हाण, दहेगांव बोलका, लौकी आणि घोयेगांव या पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर सुरेगाव, मंजुर, शहाजापूर, मूर्शतपूर या ४ ग्रामपंचयातींमध्ये सरपंचपदावर काळे गटाने बाजी मारली.