Breaking News

‘अजय अतुल’ यांच्या अदाकारीवर नगरकर खूश!


अहमदनगर : ‘लेक वाचवा’ अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक महोत्सवात गीत आणि संगीतकार अजय अतुल यांच्यासह इतर कलाकारांच्या अदाकारीवर नगरकर बेहत खूष झाले. कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासह जनसेवा फौंडेशन आणि कलाकारांनी लाखो रसिक प्रेक्षकांना दिलेला ‘बेटी बचाव’ चा संदेश या कार्यक्रमाचे वेगळेपण दाखवून देणारा ठरला. 
युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून नगरच्या वाडियापार्कच्या भव्य दिव्य अशा पटांगणात या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी लोणी येथे अशा पध्दतीचा महोत्सव आयोजित करून जनसेवा फौंडेशनने सामाजिक दायित्व जोपासले होते. यंदा नगरमध्ये हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून फौंडेशनच्यावतीने पुन्हा एकदा ‘लेक वाचवा’ अभियानाचा जागर करण्यात आला. 

सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा फौंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी रूबल अग्रवाल, अंजली देवकर वलाकट्टी, वर्षा गाढवे, अंजली, नंदीनी गायकवाड, अनुराधा ठाकूर, शेख शकीला, अॅड. निर्मला चौधरी, डॉ. सिमरनकौर वधवा, तेजस्विनी सातपुते, कविता आव्हाड, डॉ. विमल ढेरे, शर्मिला भोसले यांना जि. प. अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. 

अभिनेते आणि नाम फौंडेशनचे मकरंद अनासपुरे व सई ताम्हणकर यांनी आपल्या अस्सल ग्रामीण ढंगात उपस्थित लाखो रसिक प्रेक्षकांशी निवेदक म्हणून संवाद साधला. नगरच्या भूमीची वैशिष्ट्य आणि या सांस्कृतिक महोत्सवाचा सामाजिक उद्देश विशद करत या सांगितिक मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अभिजीत सावंत, स्वप्नील बांदोडकर, योगिता गोडबोले, बेला शेंडे या गायकांनी हिंदी मराठी गाण्यातून या मैफलीला बहारदार सुरूवात करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे यांचा नृत्याविष्कार नगरकरांना ठेका धरायला लावणारा होता. ‘वाजले की बारा’ या गाण्यावर अमृता खानविलकरने केलेल्या नृत्यावर वाडियापार्कमध्ये उपस्थित तरूणाईने मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. 

मैफलीच्या मध्यंतरी अजय अतुल यांचे प्रत्यक्ष रंगमंचावर आगमन झाले. मराठीला साता समुद्रापार नेवून ठेवणाऱ्या या जोडगोळीने आपल्या गायकीने लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले. मागील काही वर्षांत गाजलेली रसिकांच्या ओठावरली गाणी म्हणत अजय अतुल यांनी नगरकरांची दाद मिळवली. या महोत्सवाचे संयोजक डॉ. सुजय विखे पाटील यांना व्यासपीठावर बोलावून अजय अतुल यांच्यासह मकरंद अनासपुरे व सई ताम्‍हणकर यांनी दिलखुलास संवाद साधला. जनसेवा फाउंडेशनच्या कार्याची माहिती सांगतानाच सामाजिक बांधिलकीचे फौंडेशनचे काम सुरू असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. ‘लेक वाचवा’ अभियानाचा जागर यापुढेही अजय अतुल आणि मराठी कलावंतांच्या उपस्थितीत होतच राहील, असे नमूद करून तरुणांनी संयमाने राजकीय आणि सामाजिक वाटचालीत काम करण्याचा संदेश डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला. डॉ. सुजय विखे पाटील यांचे कार्यक्रमातील व्यवस्थापन कौशल्याचे अनेकांनी कौतुक केले. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजय अतुल यांच्यासह सर्वच कलाकारांचे स्वागत करून या कलाकारांनी नगरकरांना ‘याड लावलय’, असा खुमासदार उल्लेख केला. नाम फौंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले काम आम्हाला प्रेरणा देणारे आहे. यामुळे २०८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना जनसेवा फाउंडेशनने सहकार्याचा हात दिला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णसाहेब शेलार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱे मान्यवर व रसिक श्रोते या मैफिलीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.