Breaking News

कृषी उद्योगासाठी 41 तरुणांची पहिली तुकडी सज्ज


नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा रेलीज कृषी प्रशिक्षण योजनेंतर्गत (ट्रेट्स) प्रायोगिक तत्वावर पथदर्शी प्रकल्प म्हणून विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात विद्यावेतनासह सहा महिन्यांचा अभ्यासक्रम राबविण्यात आला. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या 41 युवा शेतकर्‍यांच्या पहिल्या या तुकडीने शेतीपूरक व्यवसायाची प्रशिक्षणाच्या समारोपाच्या दिवशीच मुहूर्तमेढ रोवून पारंपरिक शेतीला नावे आधुनिक आश्‍वासक वळण देण्यासाठी पाउल उचलले.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 41 विद्यार्थ्यांना कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच त्यापैकी गरजू 15 विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटपही करण्यात आले. कृषी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे सर्वोत्तम माध्यम आहे. देशभरातील 14 मुक्त विद्यापिठांपैकी मुक्त विद्यापीठातच कृषी शिक्षणाची तशी सोय आहे. त्यामुळे या विद्यापीठामार्फत मिळणार्‍या आधुनिक कृषी शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच समाज व देश हितासाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन यावेळी झालेल्या समारोप कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी केले. सांगता समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
महाराष्ट्रातील तरुणांना आधुनिक शेतीच्या माध्यामातून रोजगार व व्यवसायाच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी मुक्त विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्र सुरु करण्यात आले. त्यास आरंभापासून राज्यातील कानाकोपर्यातील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 

कृषी संबंधित कौशल्याधारित प्रशिक्षण सुरु करण्यातही येथील कृषी विज्ञान केंद्राने बाजी मारली, त्याचा आपणांस अभिमान असल्याचे कु लगुरू म्हणाले. टाटा ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकारी लैला सेठना यांनी हे प्रशिक्षण अनमोल असून त्याचा प्रशिक्षित कृषिजन विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी करावा असे आवाहन केले. टाटा ट्रस्टचेच वरिष्ठ अधिकारी राधाकृष्ण तेरकर यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाचे असून लोकांच्या आवडी निवडीही बदललेल्या आहेत, त्यानुसार प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी आपली कृषी रोजगार उद्योगातील धोरणे ठरवावीत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे यांनी केले. संग्राम केसकर यांनी आभार मानले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक, अ धिकारी - कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.