Breaking News

नगराध्यक्षपदी प्रतिभा भैलुमे यांची उपनगराध्यक्षपदी नामदेव राऊत यांची बिनविरोध निवड


कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सहयोगी सदस्य प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची तर उपनगराध्यक्षपदी नामदेव राऊत यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली.

कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. कर्जत नगरपंचायतीच्या पुढील अडीच वर्षासाठी मागासवर्गीय महिला राखीव आरक्षण असल्याने नगरपंचायतीमध्ये मागासवर्गीय महिला राखीवसाठी प्रतिभा भैलुमे या एकमात्र अपक्ष निवडून आलेल्या पात्र होत्या. या निवडीसाठी भैलुमे यांचा एकमेव अर्ज प्राप्त असल्याने नगराध्यक्षपदी त्यांची निवड निश्‍चित मानली जात होती. कर्जत शहराच्या विकासासाठी त्यांनी निवडून आल्यापासून भाजपाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व राखले गेल्याचा दावा केला आहे.

उपनगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांचेकडे दाखल करण्यात आले होते. सर्व नगरसेवकांच्या अग्रहाने उपनगराध्यक्षपदी भाजपाकडून नामदेव राऊत यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सूचक म्हणून हर्षदा काळदाते तर अनुमोदक म्हणून बापूसाहेब नेटके यांच्या स्वाक्षरी होत्या. तर काँग्रेसकडून उपनगराध्यक्षपदासाठी मोनाली तोटे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र मोनाली तोटे यांनी वेळेत अर्ज माघारी घेत, विद्यमान नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. यावेळी या बिनविरोध निवडीचा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे आणि उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांची सवाद्य मिरवणूक कर्जत शहरातून काढण्यात आली. कर्जतचे ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांचे दर्शन घेत शहरातून गुलाल उधळण करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरिकर, काका धांडे, रामदास हजारे, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, नगरसेवक सुधाकर समुद्र, तारेक सय्यद, लाला शेळके, नगरसेविका नीता कचरे, वृषाली पाटील, राखी शहा, रानी गदादे, मंगल तोरडमल, मनीषा सोनमाली, उषा राऊत-मेहत्रे, हर्षदा कालदाते, कार्यालयीन प्रमुख संतोष समुद्र, नंदकिशोर भैलुमे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, भास्कर भैलुमे, अनिल गदादे, नितीन तोरडमल, अमृत कालदाते, सतीष समुद्र, वैभव शहा, अजय भैलुमे, अनुज काळदाते, सौरभ मांढरे, प्रणव भैलुमे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.