Breaking News

स्वतःच्या फायद्यासाठी दोन मंत्री विविध ठिकाणी जयंती साजरी करताहेत : भिसे


जामखेड : तालुक्यातील चोंडी येथे साजरी होणारी अहिल्यादेवी होळकर जयंती ही भाजप प्रणित आहे. स्वतःच्या फायद्यासाठीच दोन मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी जयंती साजरी करत आहेत. या मंत्र्यांचा समाजासाठी काहीही उपयोग नाही. हे मंत्री समाजाचे नाव सांगून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. यातून समाजासाठी कसलीही प्रेरणा मिळत नाही. म्हणून धनगर समाज व बहुजन एकता परिषद चोंडीतच परवानगी नाही मिळाली तरी वेगळी जयंती साजरी करणारच अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष इंद्रकुमार भिसे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेत दिली. यामुळे चोंडीत शासकीय जंयतीबरोबर समाजबांधव शेजारी दुसरी जयंती साजरी करणार आहेत.काल जामखेड येथे इंद्रकुमार भिसे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी दत्ता करे, आप्पासाहेब पालवे, उत्तम मदने, शिवाजी वाडीकरसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भिसे म्हणाले की, पालकमंत्री राम शिंदे व मंत्री महादेव जानकर यांचे समाजाविषयीचे पुतणा मावशीचे प्रेम आहे. समाजाचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. चोंडीत समाज श्रध्देने येतो, नेते मात्र याचा वापर राजकारणात स्वतःचे वजन वाढविण्यासाठी करतात. वेगवेगळ्या राज्यातून नेते आणतात, त्यांची भाषाही सामान्य लोकांना कळत नाही. ही जयंती फक्त भाजपमय जयंती आहे. आमचा अहिल्यादेवीचा ध्वजाला रंग हा पहिल्यापासून पिवळा रंग आहे. पण आता भाजपा सरकार याचे भगविकरण करत आहे. पिवळ्या रंगाचे भगविकरण चालले आहे. अहल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठे आहे. परंतू धनगर समाजाच्या नेत्यांनी ते फक्त धनगर समाजापुरतेच ठेवले आहे. आम्ही मात्र हिंदू, मुस्लिम सर्व बहुजन समाजास एकत्र घेऊन जयंती साजरी करणार आहेत. चोंडीत कोट्यावधी रुपयांचा निधी येतो, परंतु विकास कामे संथगतीने सुरू आहेत. गावातील लोकांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. चोंडी हे विचारांचे परिवर्तन व्हावे 2025 साली अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंतीसाठी देशभरातून 50 लाख बहुजन बांधव उपस्थित राहतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. आम्ही चोंडीत बाल संस्कार शिबीरे, आरोग्य शिबीरे, थोर नेत्यांची व्याख्याने आयोजित करणार आहेत. चोंडी हे अस्मिता ठिकाण म्हणून प्रसिद्धीस आणणार आहेत.

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अन्यथा आतापर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. सुट्टी जाहीर न केल्यास आम्ही शासकीय मालमत्तेची तोडफोड करून जेलभरो करणार आहोत.