Breaking News

शेतकऱ्यांना थेट जागेवर पीककर्ज वाटपाचा अभिनव प्रयोग


चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात खरीप कर्ज वाटपासाठी जिल्हा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा अभिनव प्रयोग सुरु केला असून येत्या २९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात खरीप पीक कर्ज वाटप मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित राहणार असून त्याच ठिकाणी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षीच्या खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, बँक व अन्य यंत्रणांकडून पूर्ण सहकार्य मिळावे, कुठेही त्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रशासन आता शेतकऱ्याच्या भेटीला सज्ज असणार आहे. २९ तारखेला प्रत्येक तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांना आवश्यक असणारे पीक कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया तहसिल कार्यालयातच पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यासाठी तयारी केली असून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांनी 29 तारखेला तहसिल कार्यालयात येताना सातबारा (अद्ययावत) गाव नमुना 8-अ, आधार कार्ड किंवा निवडणूक कार्ड, दोन पासपोर्ट छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला तहसिल कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, सहाय्यक निबंधक, संवर्ग विकास अधिकारी, तलाठी, ग्राम सेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गट सचिव, तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज वाटप आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्ह्याचे पीककर्जाचे 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांनाच मोठया प्रमाणात कर्ज मिळावे, यासाठी या मेळाव्यांचे आयोजन आहे. या सर्व यंत्रणेवर २९ तारखेला जिल्हाधिकारी स्वत: लक्ष घालणार असून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.