Breaking News

अंधाराचा फायदा घेत केडगावमध्ये होत असलेल्या चोर्‍यांमुळे भितीचे वातावरण


अहमदनगर - महापालिका हद्दीतील केडगाव मधील मोहिनीनगर, शास्त्रीनगर, दुधसागर, एरांडवाडी मधील बहुतांशी पथदिवे हे अनेक महिन्यांपासून बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याची मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त कार्यालयात देण्यात आले यावेळी शवप्रहार संघटनेचे शहराध्यक्ष वैभव कदम, विजय इंगळे, स्वप्निल परांडे, राजन कदम, सचिन वाघमारे, भाऊ शेंडगे, माऊली पठारे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर पथदिवे आठ दिवसाच्या आत सुरु न झाल्यास स्थानिक नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रहार संघटनेचे शहराध्यक्ष वैभव कदम यांनी दिला आहे.

केडगाव मधील मोहिनीनगर, शास्त्रीनगर, दुधसागर, एरांडवाडी मधील बहुतांशी पथदिवे हे अनेक महिन्यांपासून नादुरुस्त व बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. पथदिवे चालू नसल्याने अंधाराचा फायदा घेत या प्रभागात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण परिसर अंधकारमय झाला असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पथदिवे दुरुस्तीची मागणी करूनही त्यांची कसलीही दखल महापालिका प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने बंद पडलेले सदर भागातील पथदिवे सुरु करण्याची मागणी शिवप्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
 
नागरिकांनी तक्रार करूनही जर महापालिकेकडून कसलीही दखल घेतली जात नसेल तर ही मोठी शोकांतिका असल्याचे मत शहर अध्यक्ष वैभव कदम यांनी व्यक्त केले. सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे लोकप्रतिनिधींनी अथवा महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर सामान्य नागरिकांनी नेमका न्याय कुणाकडे मागायचा? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. येत्या आठ दिवसात सदर भागातील बंद पथदिवे सुरू न झाल्यास परिसरातील नागरिकांसह शिवप्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे