Breaking News

‘दूध विकास’ प्रकल्पाद्वारे शेतक-यांना 150 कोटींचे वाटप


नागपूर, दि. 26, मे - विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना शेतीला दूध व्यवसायाची जोड मिळावी तसेच नैराश्य व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतक-यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने एनडीडीबी दूध प्रकल्प सुरु करण्यात आला असून अल्पावधीतच हा प्रकल्प शेतक-यांच्या जीवनात नवीन बदल घडविण्यासाठी सक्षम ठरला आहे. विदर्भ व मराठवाडा विभागातील 11 जिल्ह्यातील 3023 गावात एनडीडीबीच्या माध्यमातून दररोज सरासरी 2 लाख लीटर दूध संकलीत करण्यात येत असून 27 हजार 326 दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये 150 कोटी 43 लक्ष रुपये थेट जमा झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नाने एनडीडीबी हा मदर डेअरीचा प्रकल्प सुरु झाला असून विदर्भ व मराठवाड्यातील 3 हजार गावामध्ये दूध संक लनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील युवकांमध्ये स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणे व शेतकर्‍यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे उत्पादित होणार्‍या दुधाचे संकलन करणे, प्रक्रिया व विपणन सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी ग्रामीण भागात सशक्त दूध संकलन संस्था उभारण्यासही हा प्रकल्प सक्षम ठरला आहे.

शेतक-यांकडील उत्पादित होणा-या दुधासोबतच दुधाळू जनावरांची संख्या वाढविणे तसेच कृत्रिम रेतनाच्या या भागातील दुधाळू जनावरांची उत्पादन क्षमता वाढविणे तसेच शेतक-यांच्या दाराशी कृत्रिम रेतनाची सुविधा पोहोचविणे, जनावरांना पोषण व पुरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची निगा राखणे या सुविधा ग्रामीण भागातील शेतक-यांपर्यंत पुरविल्या जात असल्यामुळे प्रथमच मोठ्या प्रमाणात विदर्भ व मराठवाड्यातील 3 हजार गावात दुधाचे उत्पादन वाढले आहे.

दूध संकलन करतांनाच प्रत्येक गावात प्रक्रिया व विपणन तसेच सशक्त दूध संकलन संस्था स्थापन करण्याच्या एनडीडीबी या मदर डेअरीमुळे दुधाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. दूध संकलन सुरु झाल्यापासून सरासरी प्रत्येक दहा दिवसामागे दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात 6 कोटी 50 लक्ष रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. त्यासोबतच दूध संकलन केंद्रावर कार्यरत असलेल्या सहाय्यकाला सरासरी 10 ते 12 हजार रुपये मिळत आहेत. प्रति लीटर 1 रुपये याप्रमाणे 30 ते 40 हजार रुपये काही सहाय्यक प्रतिमाह मिळवत आहेत.
विदर्भ-मराठवाडा विभागात 952 दूध संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 1 हजार 378 गावांचा समावेश असून 27 हजार 326 दूध उत्पादक शेतकरी दररोज दूध उत्पादन केंद्रामध्ये नियमित प्रमाणे प्रतिदिन 2 लाख 9 हजार 913 लीटर दूध जमा करत आहेत. यासाठी 7 ठिकाणी चिलींग सेंटर सूद्धा सुरु करण्यात आले आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्यातील 40 गावांमध्ये पथदर्शी पशुआहार कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा शेतक-यांना दूध उत्पादनासाठी चांगला लाभ होत आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिदिन 70 हजार लीटर दूध दररोज संकलीत होत असून 30 रुपये प्रति लीटर याप्रमाणे 13 हजार 181 शेतक-यांच्या बचत खात्यात 21 कोटी रुपये थेट जमा होत आहेत.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामधून 1 लक्ष 39 हजार 896 लीटर दूध दररोज संकलीत होत असून सरासरी दररोज 30 रुपये प्रति लीटर हा दर दिला जात आहे. त्यामुळे 14 हजार 154 शेतक-यांच्या खात्यांमध्ये 41 कोटी 96 लक्ष रुपये थेट जमा होत आहेत. सर्वाधिक दूध नागपूर जिल्ह्यातून 48 हजार 709 लीटर संक लीत होत असून वर्धा 31 हजार 189 लीटर, अमरावती 26 हजार 995 लीटर, चंद्रपूर 17 हजार 317 लीटर, बुलढाणा 14 हजार 500 लीटर अशा प्रकारे दूध संकलन एनडीडीबीमार्फत क रण्यात येत आहे.

नागपूर शहरात 37 केंद्रामार्फत दूध व दुग्धजन्य पदार्थ:- नागपूर शहरातील नागरिकांना मदर डेअरीचे सर्व दूग्धजन्य पदार्थ उपलब्ध व्हावे यादृष्टीने 37 ठिकाणी विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहेत. एनडीडीबीतर्फे सर्व केंद्रे माजी सैनिकांच्या माध्यमातून चालविण्याच्या निर्णयानूसार माजी सैनिकांना ही केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रासाठी नागपूर शहरात महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून 17 विक्री केंद्रे सुरु झाली आहेत.