उस्मानाबादची मतमोजणी पुढे ढकलली
उस्मानाबाद : उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. ही मतमोजणी गुरूवारी 24 मे रोजी होणार होती. मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर हा निकाल आता कधी जाहीर होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडून उस्मानाबाद जिल्हाधिकार्यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसंदर्भात अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे निवडणूक अधिकार्यांनी निर्णय घेतल्यची सूत्रांची माहिती आहे. मुख्य निवडणूक अधिकार्यांनी पत्र पाठवूनच मतमोजणी उद्या होणार नसल्याचे कळवले आहे. विशेष म्हणजे, या जागेची मतमोजणी उद्या नाही, मग नेमकी कधी होईल, याबाबत काहीही माहिती निवडणूक अधिकार्यांनी पत्रात दिलेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम राहिला आहे.
