Breaking News

जैव विविधतेचे संवर्धन ही काळाची गरज

सुपा / प्रतिनिधी । पारनेर येथील सृष्टीमित्र परिवार यांच्यावतीने पारनेर पब्लिक स्कूल येथे जागतिक जैव विविधता दिन साजरा करण्यात आला, यावेळी मार्गदर्शन करताना सृष्टीमित्र परिवारचे अध्यक्ष लतीफ राजे म्हणाले की, मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे अनेक सजीव या भूतलावरून कायमचे नष्ट झाले आहेत. म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या सजीवांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. याप्रसंगी प्राचार्य गिताराम म्हस्के, शिक्षक उपस्थित होते. 

लतिफ राजे पुढे म्हणाले की, पर्यावरणातील सूक्ष्मजीव, पशुपक्षी, वनस्पती हे सर्व निसर्गाने मानवासाठीच तयार केलेले आहेत, परंतु भौतिक सुखासाठी मानव या जैव विविधतेचा विध्वंस करीत आहे. त्याच्या दुष्परिणामाला तोंड देण्याची वेळ मानवावर आली आहे. त्यासाठी आता मानवालाच पुढाकार घ्यावा लागेल, आपल्या परिसरातील जैव विविधतेचे संवर्धन करावे लागेल, म्हणून सन 2000 सालापासून जगभरात 22 मे जैव विविधता दिन साजरा केला जातो. प्राचार्य गिताराम म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.