Breaking News

पावसाळी गटारे सफाईचा गाळ 48 तासात उचलण्याचे निर्देश


नवी मुंबई, दि. 11, मे - महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, पदपथ, दैनंदिन गटारे तसेच पावसाळी गटारे यांची साफसफाई करण्याचे काम 91 कंत्राटदारांमार्फत करण्यात येत असून 15 ए प्रिलपासून या कंत्राटदारांनी आपापल्या गटात असलेल्या पावसाळी गटारांची सफाई करण्यास सुरुवात केलेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी पावसाळी गटारे व नैसर्गिक नाले सफाई कामांकडे संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी काटेकोर लक्ष दयावे असे निर्देश दिलेले आहेत.

पावसाळी गटारांची सफाई करताना गटारातून निघणारा ओला गाळ सुकल्यानंतर तो 48 तासांच्या आत उचलणे अपेक्षित आहे. याबाबत मुख्यालय स्तरावर आयोजित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक यांच्या विशेष बैठकीमध्ये 91 कंत्राटदारांना पावसाळा पूर्व गटार सफाई बाबत आवश्यक अशा उपयोगी सूचना करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पावसाळी गटारे सफाईतून निघणारी माती अथवा गाळ यांची वाहतूक लगेच करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.

तसेच या कामावर प्रशासिकीय नियंत्रण ठेवणा-या स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, व उप स्व्च्छता निरीक्षक यांचेमार्फतही पावसाळापूर्व गटार सफाई करताना निघणारा ओला गाळ उचलण्यासाठी कंत्राटदारांना वेळोवेळी तोंडी सूचना व लेखी पत्र देऊन सूचित करण्यात आले आहे. तथापि गाळ उचलण्यासाठी डंपर वा ट्रक अशी वाहने उपलब्ध होत नसल्याने गाळ उचलण्यास उशीर होत असल्याबददल कंत्राटदारांमार्फत सांगण्यात येत आहे. मात्र काढलेला गाळ हा सुकून देऊन 48 तासात उचलणे आवश्यक असल्याने व तो न उचलल्याने निविदेतील अटी व शर्तीचा भंग होत असल्याने, ही बाब संबधित विभागातील स्वच्छता अधिकारी यांनी विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असून 91 कंत्राटदारांपैकी वाहने उपलब्ध होत नसल्याची सबब सांगणार्या 32 कंत्राटदारांकडून एकूण 2 लक्ष 5 हजार इतक्या रक्कमेचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच कंत्राटदारांना तात्काळ गाळ उचलून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, तुर्भे येथे वाहतूक करून घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार विहीत पध्दतीने पावसाळी गटारे व नैसर्गिक नालेसफाई व्हावी याकडे सर्व आठही विभागातील सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व इतर अभियंते तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक दक्षतेने लक्ष ठेवीत असून 25 मेपर्यंत पावसाळी पूर्व सफाई कामे पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे.