Breaking News

खते, बी-बियाणांच्या बोगसगिरीवर भरारी पथकाची करडी नजर; जिल्हाभरात 42 निरीक्षक


कुळधरण : यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच खते- बी-बियाणांची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. खते, बी-बियाणांच्या बाबतीत बोगसगिरी होऊन शेतकरी वर्गाची फसवणूक होऊ नये, यासाठी 42 निरीक्षकांच्या भरारी पथकाची प्रशासनाने नियुक्ती केली असून, जिल्ह्यातील खते, बी-बियाणे दुकानदारांच्या दुकानांची वेळोवेळी तपासणी होणार आहे. गैरप्रकार आढळल्यास परवाना रद्द केला जाऊन, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, यामुळे गैरप्रकारांना चाप बसणार आहे.

जिल्हाभरात प्रशासनाने 42 निरीक्षकांची पथके तैनात केली असून, खते, बी-बियाणांच्या विक्रीवर भरारी पथकांची करडी नजर राहणार आहे. प्रशासनाकडून खरीप हंगामाचे नियोजन सुरू आहे. शेतकर्‍यांकडून होणारी खते, बियाण्यांची मागणी विचारात घेऊन त्यानुसार उपाय योजनाही केल्या जात आहेत. खते-बी-बियाण्यांच्या विक्रीमुळे बोगसगिरी करणार्‍या दुकानदारांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होत असते. यावेळी तसे होऊ नये, याचीही खबरदारी घेतली जात आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकर्‍यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बियाणे, खते व किटकनाशकांची तपासणी केली जात आहे. त्याबरोबरच आता दुकानदारांचे लायसन्सही तपासले जाणार आहे. बर्‍याच वेळेस परवाना दिल्यानंतर संबंधिताकडून खते, बियाण्यांची विक्री केली जात नाही. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत दुकानांचा परवाना, त्यानुसार बियाणे, खतांची विक्री होत आहे का याची पाहणी केली जाणार आहे. बोगस खते विकली जाऊ नयेत, याकडे लक्ष देण्यात आले आहे. गैरप्रकार आढळून आल्यास परवाना रद्द केला जाणार आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामाची आढावा बैठक 21 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. त्या बैठकीत शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची टंचाई जाणवू नये, यासाठी पूर्ण नियोजन केले असल्याचे सूतोवाच करतानाच खते-बियाणांच्या बाबतीत शेतकर्‍याची फसवणूक होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी प्रशासनास दिलेले आहेत.


बोगसगिरीला बसणार चाप खते-बियाणांच्या बाबतीत फसवणूक आणि काळाबाजार असे प्रकार घडल्याचे अनेकदा समोर येते. यामुळे शेतकरी वर्गाची लूट होतानाच खराब बियाणे व खतामुळे उत्पन्नाचा हंगाम वाया जातो. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र, अशा घटनांना जबाबदार असणारे विक्रेते मात्र मोकाट राहतात. या मोकाटांना चाप बसावा यासाठी निरीक्षकांच्या भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अशा केंद्रचालकांना चाप बसणार आहे.


माहिती फलकांचा अभाव शेतकर्‍यांना खते, बी बियाणे, कीटकनाशके आदींचा पुरवठा करण्यासाठी शासनाकडून कृषी सेवा केंद्र चालकांना परवाने दिले जातात. यामध्ये त्यांनी शासकीय नियमांनुसार मालाची विक्री करावी ही अपेक्षा असते. मात्र कित्येक केंद्रचालक नियम झुगारून विक्री करत शेतकर्‍यांची लुट करतात. ग्राहकांना पावत्या न देणे, दरफलक न लावणे, साठ्याची नोंद न ठेवणे, बनावट बियाणे कीटकनाशके विकणे, मालाचा साठा योग्य स्थितीत न ठेवणे अशा अनेक तक्रारी आढळून येतात. ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत केंद्र चालक शेतकर्‍यांची लुट करतात.कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी या कारवाई कामी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास येते.