Breaking News

स्वतंत्र आयुक्तालयासाठी 14 निरिक्षकांची नियुक्ती


पुणे : नव्याने स्थापन होणार्‍या बहुचर्चित पिंपरी -चिंचवड पोलीस मुख्यालयाकरिता राज्यभरातील 14 पोलीस निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आयुक्तालय नव्याने स्थापन केल्यानंतर हे सर्व पोलीस अधिकारी याठिकाणी रुजू होणार आहेत. त्याकरिता स्वतंत्र आदेश दिले जाणार आहेत. विशेष पोलीस महानिरिक्षक राजकुमार हटकर यांनी हा आदेश दिला आहे.पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या लक्षात घेत, स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आयुक्तालय स्थापनेकरिता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरविण्यात आला होता. मात्र, आयुक्तालयासाठी जागा निश्‍चित न झाल्याने, हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला.काही दिवसांपुर्वी पालकमंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषद घेत, येत्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नवे पालीस आयुक्तालय सुरु होणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस आयुक्तालयासाठी चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची इमारत निश्‍चित करण्यात आली आहे. तर मुख्यालय आणि राखीव पोलीस दलासाठी निगडी पोलीस ठाण्यालगतची महापालिका मुलांची शाळा क्रमांक एक ही इमारत निश्‍चित करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त कार्यालयांकरिता स्पाईन रोड येथे असलेल्या तीन क्लब हाऊसच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. नव्याने स्थापन केल्या जाणार्‍या पोलीस आयुक्तालयांतर्गत पुणे शहर पोलीस हद्दीतील नऊ आणि ग्रामीण पोलीस हद्दीतील पाच अशा एकूण 14 पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे.