Breaking News

शहर, जिल्ह्यत 111 सजा व 19 मंडलची भर पडणार


सोलापूर, दि. 14, मे - राज्य शासनाने महसूल प्रशासनावरील वाढता ताण कमी करण्यासाठी शासनाने नवीन सजा व मंडल वाढीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयांकडून मागविले होते. यानुसार शहर, जिल्ह्यत 111 सजा व 19 मंडलची भर पडणार आहे. यामुळे तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावरील कामाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. या वाढीमुळे सजांची संख्या 646 तर मंडल संख्या 115 वर पोहोचणार आहे. शासनाकडून मंजुरी मिळण्यापूर्वी नवीन निर्मिती होणारे सजा, मंडल याचे नकाशे, खातेदार संख्या याबाबत तहसीलनिहाय पूर्वतयारी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. यापूर्वी 2008 मध्ये नवीन सजानिर्मिती करण्यात आली होती. यामध्ये फक्त नवीन सजा व मंडल संख्या वाढल्याने तलाठी व मंडलाधिकारी पदांमध्येही वाढ करावी लागणार आहे.
 
नवीन सजा व मंडल निर्मिती करताना लोकसंख्या व खातेदारांच्या संख्येतील वाढ, जमिनीचे व्यवहार याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात 10 सजा, मनपा व नगरपा लिका क्षेत्रापासून 10 कि.मी. परिसरात म्हणजेच झालर क्षेत्रात 13 सजा व इतर ग्रामीण भागात 2 सजानिर्मिती करण्यात येणार आहे. नवीन सजा वाढल्यास तलाठ्यांवरील कामांचा ताणही कमी होईल, परिणामी नागरिकांच्या कामेही वेळेत होण्यास मदत होणार आहे. सोलापूर शहरचा समावेश असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक नवीन 25 सजा व 4 मंडलची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या शहरासाठी सोलापूर ही एकच सजा असून त्यामध्ये नवीन 10 सजांची भर पडणार आहे. शहरात कसबे सोलापूर, नेहरूनगर, मजरेवाडी व सलगरवाडी ही चार गावे असून यामध्ये नव्याने सजा निर्मिती करण्यात येणार आहेत. बाळे, सोरेगाव, शेळगी व इतर नवीन सजा तयार होतील. करमाळा तालुक्यात नवीन 16, माळशिरस तालुक्यात 14 व पंढरपूर व माढा तालुक्यात प्रत्येकी 12 सजांची निर्मिती करण्यात येणार आहे.