शेतकर्यांचा पुन्हा एल्गार 1 जूनपासून देशव्यापी शेतकरी संप ; 10 जूनला भारत बंदचे आवाहन
मुंबई : सरसकट कर्जमाफी, हमीभाव योजना, दुधाला योग्य दर आणि बैलगाडी शर्यतीच्या कायदेशीर मान्यता अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एक ता यांच्यातर्फे देशभर 1 ते 10 जूनला शेतकरी संप पुकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शेतकर्यांच्या याच मागण्यांसाठी 40 शेतकर्यांच्या संघटना असलेल्या सुकाणू समितीने 14 मे ला राज्यभरात जेलभरो आंदोलन केले होते. सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्यामुळे राज्यभरातल्या शेतकर्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. म्हणूनच हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 10 जूनला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन गनिमी कावा पद्धतीने करण्यात येणार असून प्रत्येक शहरातील शेतकरी स्वतःची उत्पादने बाजारात न विकता वैयक्तिकरित्या विकणार असल्याची माहिती या संघटनेतर्फे देण्यात आली आहे. देशभर छेडण्यात येणारे हे आंदोलन देशातले सर्वात मोठे आंदोलन असणार आहे. ज्यामध्ये जम्मू काश्मीरसह केरळपर्यंत एकूण 22 राज्यांमध्ये राष्ट्रीय किसान महासंघाच्या 130 संघटना आणि किसान एकता संघाच्या एकूण 60 संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जवळजवळ 170 संघटना या आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन दोन्ही संघटनांतर्फे देण्यात आली.
