Breaking News

दखल - न्यायाचा विजय

मुंबई उच्च न्यायालयानं जेव्हा हीट अँड रन प्रकरणात निकाल दिला, तेव्हा न्यायव्यवस्था विकावू आहे, अशी टीका झाली होती. खालच्या न्यायालयानं सलमान खानला शिक्षा सुनावली, तेव्हा निकालपत्र कसं तातडीनं दिलं गेलं आणि उच्च न्यायालयानंं तातडीनं जामीन कसा दिला, याची चर्चा तेव्हा झाली होती. न्यायालयापुढं जी कागदपत्रं सादर होतात, तपास यंत्रणा जी बाजू मांडते, त्यावर निकाल अवलंबून असतो. सलमान खान यानं तेव्हा चालकाला बळीचा बकरा बनविलं होतं, हे उघडं सत्य होतं.

सलमानचा अंगरक्षक जो फिर्यादी होता, त्याचं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं होतं. त्याला वेडं लागलं. त्यामागंही तपास यंत्रणा आणि सलमान होता, हे उघड होतं; परंतु ते सिद्ध करणं अवघड होतं. न्यायालयाला दोष देण्यात अर्थ नसतो, तर तपास यंत्रणा कसं काम करतात, यावर निकाल अवलंबून असतो. ज्याला आतापर्यंत वीस वेळा तुरुंगवारी करावी लागली, तो केवळ अभिनेता आहे, म्हणून सहानुभूती दाखविण्याची गरज नाही. जो कोणी कायदा हातात घेतो, तो कितीही मोठा असला, तरी त्याला जेव्हा शिक्षा होते, तेव्हा सामान्यांचा कायद्यावरचा विश्‍वास दृढ व्हायला मदत होत असते. कायद्यापुढं कोणी मोठा, छोटा नसतो. कायद्याचे हात लांबपर्यंत पोचलेले असतात, हे सिद्ध व्हायचं असेल, तर गुन्हेगार कितीही मोठा, प्रतिष्ठित असला, तरी त्याच्या भोवती कायद्याचा फास आवळला जाऊ शकतो, हे दिसलं, तरी गुन्हे करणार्‍यांना अटकाव होऊ शकतो. त्यासाठी जोधपूरच्या न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा म्हणावा लागेल. या निकालावर केवळ समाधान मानून चालणार नाही, तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो कसा कायम राहील, याची काळजी घ्यावी लागेल.

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या वेळी शिक्षा ऐकून सलमान खान रडला. माणसाला मुंग्यासारखं चिरडलं, तरी ज्याच्या मनावर कोणताही कोरडा उठत नाही, त्याचे आताचे अश्रू ही खरे की ग्लिसरीन लावलेले आहेत, असं कुणालाही वाटेल. पाच वर्षांची शिक्षा झाल्यानं त्याला आता अटक झाली असून त्याची थेट जोधपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते.

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयानं दोषी ठरविलं. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असं न्यायालयानं विचारले. त्या वेळी इतर आरोपीप्रमाणं मी निर्दोष आहे, असा कांगावा त्यांनी केला. सर्व आरोप त्यानं फेटाळून लावले. या वेळी सलमान भावुक झाला होता.

या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सलमान खानला बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार आसाराम बापूच्या शेजारच्या बराकीत राहावं लागणार आहे. याच जेलमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम बापूही आहे. आसाराम बापूच्या शेजारीच सलमान खानला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तेव्हा त्याला बरॅक नंबर 1 मध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथं सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक 343 होता. दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयानं निर्दोष ठरविलं आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. 1999 साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती. वेळ कमी असल्यानं जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळं शुक्रवारी सुनावणी होईल. सीआरपीसी नियमांतर्गत शिक्षेचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असल्यास सत्र न्यायालयातून जामीन दिला जातो. त्यासाठी वकिलांना जामीन अर्जाला निकालपत्राची कॉपी जोडावी लागते. वेळेअभावी सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही.

दोन काळवीट शिकार प्रकरण 1 आणि 2 ऑक्टोबर 1998 ला कांकाणी गावात मध्यरात्री घडलं होतं. यानंतर तेथील बिश्‍नोई समाजानं सलमान आणि त्याच्यासोबत असलेल्या स्टार्स आणि इतर मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयाच्या निकालानंतर बिश्‍नोई समाजानं आनंद व्यक्त केला आहे. 1998 पासून आजतागायत सलमानला न्यायालयाच्या पायर्‍या वीस वेळा चढाव्या लागल्या आहेत. शिवाय काही प्रकरणात त्याची निर्दोष सुटका, तर काही प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान खाननं 26 सप्टेंबर 1998 ला भवाद येथे काळवीटची शिकार केली होती.

याप्रकरणी सलमानला सत्र न्यायालयानं दोषी धरलं होतं; परंतु उच्च न्यायालयानं त्याला निर्दोष ठरवलं. यानंतर सलमानच्या शिक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं. जोधपूरच्या मथानिया येथील घोडा फार्ममध्ये 28, 29 सप्टें बर 1998 च्या रात्री हे प्रकरण घडलं होतं. या प्रकरणी सलमानला 10 एप्रिल 2006 ला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. सलमान खानला 10 ते 15 एप्रिल 2006 पर्यंत 6 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये राहावं लागलं होतं; परंतु नंतर राजस्थान उच्च न्यायालयानं सलमानची निर्दोष सुटका केली. या प्रकरणात एकूण 12 आरोपी होते. कांकाणी गावात क ाळवीटाची शिकार केल्याप्रकरणावरून सलमानविरोधात आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत केस दाखल झाली होती.

सलमाननं रायफल आणि 0.32 बोरची रिव्हॉल्वरनं काळवीटची शिकार के ली होती. या केसमध्ये सलमानला जोधपूरच्या न्यायालयानं 18 जानेवारी 2017 ला निर्दोष ठरवले होतं. त्यानंतर जोधपूर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. आठ सप्टेंबर 2002 ला मुंबईतील वांद्रे परिसरात फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना सलमानच्या गाडीनं चिरडलं होतं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर इतर 4 जण जखमी झाले होते. या प्रकरणी न्यायालयानं सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सलमाननं या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केलं. उच्च न्यायालयानं डिसेंबर 2015 ला सलमानची निर्दोष मुक्तता केली होती; पण नंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आलं होतं.