Breaking News

दोन अधिकाऱ्यांमुळे तणाव निवळला


कोल्हार खुर्द प्रतिनिधी - राहूरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे दोन समाजातील वादातून तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा अंत्यविधी थांबल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पातळीवर हा वाद मिटत नसल्याने राहू राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ आणि नायब तहसीलदार तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत हा वाद मिटवला. यामुळे तणाव निवळला आणि संभाव्य दुर्घटना टळली.

कोल्हार खुर्द येथे प्रवरानदीच्याकडेला मुस्लिम समाजाचे कब्रस्थान आहे. परंतु गावातील सुधाकर भोसले हे सदरची जागा त्यांची असल्याचा दावा करत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. दरम्यान, मुस्ताक तांबोळी यांचे निधन झाले. त्यांचा दफनविधी नातेवाईक तसेच संबंधितांनी सकाळी करण्याचे नियोजन केले आणि त्याप्रमाणे सर्व नातेवाईक एकत्र जमले. मात्र दफनविधी कुठे करायचा, यावरून वाद निर्माण झाला. गावच्या सरपंचाकडूनही या प्रकरणात तोडगा निघत नव्हता. दोन्ही समाज आमने सामने उभे ठाकल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ नायब तहसीदार तळेकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या अधिकाऱ्यांनी वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही समाजाचे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर या वादावर पडदा पडला.