Breaking News

शहराची विद्यूत जोडणी भूमिगत करण्यासाठी उर्जामंत्र्यांना साकडे

शहरामध्ये संपुर्ण विद्युत तारा या केबलद्वारे भुमिगत करण्यात याव्या तसेच राहाता व परिसरातील बरेच ट्रान्सफार्मर ओव्हर लोड चालतात, तरी मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविणे गरजेचे असल्याची मागणी राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याकडे भेट दिली, यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना राहाता शहरातील काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा नेते डॉ. राजेद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, नगरसेवक निवृत्ती गाडेकर, सचिन बनसोडे, प्रशांत दंडवते, स्वप्निल बावके, दिपक सोळंकी, अभिजित काळे, दिलीप वाघमारे, हरी गाडेकर, शिवाजी आनप तसेच वीज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहाता हे तालुक्याचे शहर आहे. शिर्डी जवळील शहर असल्याने झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर लोक शेती व्यवसाय करत असतात. त्यामुळे बहुतांश लोक ही वाड्या वस्त्यांवर राहतात. परंतु कमी क्षमतेचे ट्रान्सफार्मर असल्याने ओव्हरलोड होवून ते लवकर खराब होतात. त्यामुळे मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे संपुर्ण शहर विद्युत तारांच्या विळख्यात अडकले आहे, याकरीता संपुर्ण शहारातील विद्युत तारा केबलद्वारे भुमिगत करण्याची मागणी निवेदनात केली आहे.