Breaking News

श्रीरामपूर शहरात महावितरणचा गलथान कारभार डीपी बॉक्सची झाकणे सर्रास उघडी

श्रीरामपूर / राजेश बोरुडे । शहरामध्ये ठिकठिकाणी असणारे विद्यूत रोहित्रांवरील डीपी बॉक्सचे उघडे दरवाजे नागरिकांच्या जीवाशी जीवघेणा खेळ खेळत आहेत. शहरातील सर्वच छोटे मोठे प्रमुख रस्ते, शाळा, रुग्णालयांजवळ, बसस्थानकालगतचा परिसर, नागरी वसाहतींच्या परिसरात असणार्‍या अनेक डीपींवरील डिस्टिब्युशन बॉक्सची झाकणे उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे पादचारी, कचरा वेचणारे महिला लहान मुले, वाहनचालक, शालेय बालके, नागरिकांंच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 

महावितरणने विजेचा दाब नियंत्रित करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची व्यवस्था केलेली असून त्यावर विद्युत नियंत्रण करण्यासाठी डिस्ट्रिब्युशन बॉक्स लावण्यात आलेले आहेत. डिस्ट्रिब्युशन बॉक्स हा पूणतः बंद असणे आवश्यक आहे. परंतू शहरातील बहुसंख्य डीपीवरील बॉक्सची झाकणे पूर्ण, अर्धवट उघडी आहेत. शहरातील संगमनेर रोड, नेवासा रोड, बेलापूर रोड, थत्ते ग्राउंड परिसर, गोंधवनी रोड यांसह अनेक नागरी वसाहतीजवळ अनेक विद्युत रोहित्रावरील डीपी बॉक्सची झाकणे सर्रास उघडी आहेत. अनेक डीपीवरील विजेच्या तारा निखळून खाली लटकलेल्या आहेत. अनेक डिस्ट्रिब्युशन बॉक्स हे जमिनीपासून अतिशय कमी उंचीवर आहेत. भंगार गोळा करणार्‍या महिला, बालके यांचा वावर त्याठिकाणी असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेतील लहान बालके, कचरा वेचणार्‍या महिलांचा उघड्या डीपी बॉक्सला हात लागून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रस्त्यालगत उघडे जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर असलेल्या डीपीला छोटा-मोठा अपघात होऊन वाहधारकांची धडक बसल्यास जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक डीपीवरील बॉक्सची झाकणे ही उघडे, गंजलेले, तुटलेले, जीर्ण झालेली आहेत. काही डीपीवरील बॉक्सची झाकणे अर्धवट लावलेली आहेत तर काही झाकणे दोर्‍यानी, सूतळ्यानी तारांनी बांधलेली आढळली.