Breaking News

नदीपात्रात वाळूच्या ट्रकखाली एकाचा मृत्यू रात्रीचा वाळू उपसा अन पहाटेची घटना

गोवर्धन येथे गोदावरी नदीपात्रात सुरु असलेल्या वाळू लिलावाच्या ठिकाणी वाळूच्या ट्रकखाली चिरडून काल पहाटे एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याचे समजताच ट्रक चालक या ठिकाणाहून फरार झाला तर काही अर्ध्या रस्त्यातूनच परत गेले. विशेष म्हणजे पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असल्याने रात्रीच्यावेळी बेकायदेशीरपणे वाळू उपसा सर्रास सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. 

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गोवर्धन येथे गोदावरी नदीपात्रात वाळूचा लिलाव देण्यात आलेला आहे. या ठिकाणी दररोज शेकडो वाहनातून वाळू उपसा केला जात आहे. काल पहाटेच्या सुमारास नदीपात्रात वाळू ट्रकच्या चाकाखाली सापडून विलास मंगेश पिंपळे (वय 35 रा. सिन्नर) यांचा मृत्यू झाला. घटना घडताच त्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांना देण्यात आली. त्यानंतर विलास पिंपळे याला श्रीरामपुरातील कामगार रुग्णालयता आणण्यात आले, परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
दरम्यान, याबाबत तहसीलदार सुभाष दळवी यांच्याशी संपर्क साधून रात्री वाळू उपसा सर्रासपणे सुरु असल्याचे स्पष्ट होते. याकडे लक्ष वेधले असता दळवी म्हणाले, याबाबतत मी माहिती घेत आहे. पहाटे साडेपाच-सहाच्या दरम्यान घटना घडल्याचे मला सांगण्यात आले. गाडी रिव्हर्स घेताना सदर घटना घडली असल्याचे समजते. मात्र याबाबत आपण अधिक चौकशी करत असून पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे दळवी यांनी सांगितले. नदी पात्रात पहाटे एकाचा चिरडून मृत्यू झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले नंतर ठिक ठिकाणाहून येणार्‍या वाळूच्या गाड्या आहे तेथूनच फरार झाल्या आहेत. घटना घडलेचे समजले तेंव्हा 100 ते 150 गाड्या पुणतांबा जवळ होत्या. तसेच हरेगांव, उंदिरगांव, माळेवाडी, नायगाव, रामपूर फाटा, आदी ठिकाणापर्यंत आलेल्या गाड्या निम्या रस्त्यातून परत गेल्या. मात्र राहुरी तालुक्यातील दवणगाव नंतर जिल्हाधिकारी अभय महाजन वाळू तस्कारांबाबत इतका थंडावले हे प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला.