Breaking News

मालपाणी उद्योग समूहातर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा


संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने येत्या बुधवारी {दि. २५} सायंकाळी ४ वाजता मालपाणी लॉन्स येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला दोन दशकांची परंपरा आहे. आजवर असंख्य दाम्पत्यांचे विवाह या सोहळ्यात संपन्न झाले आहेत. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मालपाणी समूह वर्षनुवर्षे हा उपक्रम राबवित आहे. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणारे विवाह राज्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहेत.
या सोहळ्यात ४१ विवाह संपन्न होणार आहेत. विशाल जनसमुदायाच्या साक्षीने ही जोडपी आपल्या सहजीवनाची सुरुवात करणार आहेत. या सोहळ्याचे यंदा २१ वे वर्ष आहे. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे अनेक उच्चशिक्षित वधूवरही यामध्ये विवाहबद्ध होत आहेत. उद्योग समुहातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कामगार प्रतिनिधी मिळून या नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळतात. सकाळी १० वाजता वर्‍हाडी मंडळींच्या आगमनाने सुरु होणारा हा सोहळा सायंकाळी सहा वाजता नववधूंना सासरी जाण्यास निरोप देऊन संपन्न होतो. उद्योग समूहाचे सर्व संचालक हा सोहळा यशस्वी करण्यास जातीने लक्ष घालतात. सामाजिक ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम गेली वीस वर्षे अव्याहत सुरु आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन मालपाणी उद्योग समुहाच्या संचालकांनी केले आहे.