शेतकर्यांना कंपन्या उभारण्यासाठी प्रोत्साहन द्या
नगर । प्रतिनिधी - शेतकर्यांच्या सर्वांगीण विकास व आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा लागू करुन, त्यामध्ये हायब्रीड लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून शेतकर्यांना कंपन्या उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली. राज्यात मोठ्या संख्येने डोंगराळ व खडकाळ जमीनी पडिक अवस्थेत आहे. त्या खडकाळ माळरान जमिनीवर काही पिकत नाही. हायब्रीड लॅण्ड पुलिंगद्वारे या जमिनीचा विकास करुन तेथे शेतकर्यांच्या शेतमालाला पूरक कंपन्या तसेच सोलर हार्वेस्टिंग व विंड हार्वेस्टिंग कंपन्या स्थापन करण्याकरिता आर्थिक सहाय्य करुन प्रोत्साहन दिल्यास शेतकर्यांना चांगले दिवस येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा व्हावा, शेतकर्यांनी ती जमीन सोलर व विंड हार्वेस्टिंगसाठी उपलब्ध करुन दिल्यास त्या मोबदल्यात त्यांना शासनाकडून रॉयल्टी मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास विजेचा मोठा तुटवडा भरुन निघणार आहे. विजेबाबत राज्य स्वयंपूर्ण होवून शेतकर्यांचा विकास देखील साधला जाणार आहे. यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबून आर्थिक विषमता दूर होणार असल्याचे अॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी कॉ.बाबा आरगडे, प्रकाश थोरात, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, किरण पाटील, जयाजीराव सूर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला आहे.
